
Chitra Wagh (Photo Credit- X)
मुंबई : निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा निघणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यावरून चांगलाच घणाघात केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापलं असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 4 ऑक्टोबरच्या प्रस्तावित मोर्चावर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. मोर्चे काढण्यापूर्वी विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, संविधानाने प्रत्येकाला आपला आवाज उठवण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, आंदोलन किंवा मोर्चा काढण्यापूर्वी स्वतःच्या कामाचं आणि भूमिकेचंही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मराठी माणसाला फसवून त्यांच्यावर मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आणणारेच आता मोर्चे काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी सध्याचं महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असल्याचं म्हटलं. विरोधकांकडून केवळ जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला आणि भाजप जिंकला तर आयोग वाईट’, अशी भूमिका घेणं योग्य नसल्याचं त्या म्हणाल्या. केवळ समोरच्याच्या चुका दाखवण्यापेक्षा स्वतःच्या त्रुटी तपासण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे. हा मोर्चा भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरापर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीतील अंतर्गत मतभेदांबाबतही चित्रा वाघ यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चांगला समन्वय आणि संवाद असल्याचा दावा त्यांनी केला. वरिष्ठ नेते एकत्र काम करत असताना इतरांच्या टीकेला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं त्या म्हणाल्या.