आम्हाला अडकवण्यासाठी AI अन् डीपफेकचा वापर!'; CJP चे प्रवक्ते सौरभ दास यांचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
Saurabh Das Allegations On Delhi Police : राज्यासह संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीची स्कूल ठिक करो मोहिम सुरू असतानाच सीजेपीचे सह-संयोजक आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्ली पोलीस अजूनही आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची चौकशी करत असून, एका कथित ‘राष्ट्रविरोधी’ कथानकात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा दास यांनी केला आहे.
‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना दास यांनी म्हटले आहे की, ” त्यांच्या सूत्रांकडून आणि पोलीस यंत्रणेतील काही संपर्कांकडून त्यांना याबाबत माहिती मिळाली आहे. कथित राष्ट्रविरोधी कथानक तयार करण्यासाठी डीपफेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), एडिट केलेल्या चॅट्स आणि इतर तंत्रांचा वापर केला जात असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
सौरभ दास यांनी काही गंभीर मुद्द्यांकडेही लक्ष वेधले आहे. दिल्ली पोलीस त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कथित राष्ट्रविरोधी कटाशी जोडण्यासाठी विविध डिजिटल साधनांचा वापर करत आहेत. यासाठी डीपफेक आणि AI तंत्रज्ञानासोबतच एडिट केलेल्या चॅट्सचा वापर केला जात आहे. हे सर्व करदात्यांच्या पैशातून केले जात आहे.
दिल्ली पोलिसांनी आपली आणि सहकाऱ्यांची चौकशी करण्याऐवजी शहरातील कथित पीजी माफिया, हॉस्पिटल माफिया आणि एज्युकेशन माफिया यांची चौकशी करावी, असा सल्लाही सौरव दास यांनी दिला. दरम्यान, दास यांच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दास यांनी आंदोलकांना आंदोलनांशी संबंधित बाबींमध्ये कायमस्वरूपी अभय देण्यात आले आहे. याचीही सौरव दास यांनी आठवण करून दिली आहे. अशा प्रयत्नांसाठी दिल्ली पोलिसांना बुकर पारितोषिक किंवा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळणार नाही. त्यामुळे, त्यांनी पोलिसांना लोकांचा वेळ आणि सार्वजनिक पैसा वाया घालवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
सौरव दास यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका जुन्या घटनेचाही उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, संसद मोर्चाच्या सुमारे तीन-चार दिवस आधी तत्कालीन पोलीस आयुक्तांना पदावरून हटवण्यात आले होते. अमित शाह यांनी गृहसचिव आणि तत्कालीन पोलीस आयुक्तांना दिलेल्या काही कथित कठोर सूचनांची अंमलबजावणी करण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे हे घडले. त्यांनी दिल्ली पोलिसांना ही घटना आठवून पाहण्याचा सल्ला दिला.
दास म्हणाले की, जर दिल्ली पोलिसांना त्यांच्याशी, आंदोलनांशी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी संबंधित काही प्रश्न असतील, तर त्यांना कोणत्याही प्रकारच्या ‘जुगाड’चा आधार घेण्याची गरज नाही. पोलीस त्यांना, अभिजीत दीपके आणि आशुतोष रांका यांना कधीही बोलावू शकतात. आम्ही तिघेही नवीन पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात एकत्र हजर राहण्यास आणि कोणत्याही प्रश्नांना सामोरे जाण्यास व दीर्घ चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. जर त्या तिघांना थेट बोलावून चौकशी केली, तर डीपफेकची गरजच भासणार नाही, कारण तसे झाल्यास, खरी माणसे पोलिसांसमोर हजर असतील. असही त्यांनी म्हटलं आहे.






