cm devendra fadnavis mumbai press confernce on calling sharad pawar uddhav thackeray for vice president elections
Devendra Fadnavis Live : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय परस्थितीवर भाष्य केले आहे. दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना मतदानाबाबत सूचना देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार व उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. यावरुन फडणवीसांवर टीका होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधून या सर्व टीकांना उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही फोन केला होता. आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत. ते आपले राज्यपाल आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी समर्थन द्यावं, अशा प्रकारची विनंती मी केली. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की सर्वांशी चर्चा करु. आणि शरद पवार यांनी सांगितलं की विरोधी पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल. पण एक कर्तत्व म्हणून आणि राज्यातील एक मतदार हे उमेदवार आहे म्हणून मी त्यांना कॉल केला,” अशी कबूली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत मुंबईतील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या विषयावर आराखडा सादर केला. याबाबत फडणवीस म्हणाले की, “मुंबईमध्ये ज्या वेळेस प्रचंड पाऊस होतो. विशेषतः कमी वेळेमध्ये सर्वात जास्त पाऊस होतो, त्यावेळी पायाभूत सुविधांवर याचा परिणाम होत असतो. यानंतर आता ज्या सुधारणा करण्याची गरज आहे ती आम्ही करणार आहोत. याबाबत राज ठाकरे यांनी काही सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी दिलेल्या चांगल्या सूचना आहेत नक्कीच आम्ही त्यांच्या सूचनांचा विचार करु,” अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जोरदार टीका केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, “आरएसएस काय बॅन्ड आर्गनायजेशन (बंदी असलेली संघटना) आहे का? मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला स्वयंसेवक असण्याचा अभिमान आहे. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला आहे. मला नेहमी समाजातील प्रत्येक व्यक्तीलाबरोबर घेऊन आपल्याला देशाचे कल्याण करायचे आहे हेच शिकवले आहे. त्यामुळे समजा जर कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेले तर त्याच्यासाठी एवढं आकांडतांडव करण्याची काय गरज आहे?” असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांना सुनेत्रा पवारांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.