Harshwardhan Sapkal Press conference on fadnavis and aurangzeb comparison
मुंबई : मागील आठवड्याभरापासून औरंगजेबाची कबर हा विषय राजकारणामध्ये चर्चेत आला आहे. सत्ताधारी नेत्यांसह विरोधातील देखील काही नेत्यांनी ही कबर उखडून टाकण्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यांवरुन नागपूर दंगल झाली. यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबसोबत केली. यावरुन त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र यावर माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण वक्तव्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे. ते म्हणाले की, “औरंगजेबाचे उदात्तीकरण यावरुन बोलताना तो क्रूर शासक होता हेच मी म्हटलं आहे. मी कारभाराबद्दल बोलत होतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझी काही चूक झाली असेल तर मी मागेन. पण मी देवेंद्र फडणवीस यांची माफी मागणार नाही. भाजपचे यामध्ये अंतर्गत राजकारण दडले आहे,” अशी स्पष्ट भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “मी जे बोललो ते राज्यकारभारच्या अनुशंगाने बोललो आहे. औरंगजेब जितक्या क्रूर पद्धतीने राज्यकारभार चालवत होता तसाच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार सुरु आहे. हे वक्तव्य मी केलं होते. यावर मी ठाम आहे. जसा औरंगजेबाने जिझीया कर लावला होता तसाच महाराष्ट्र सरकारमधील फडणवीस सुद्धा लावत आहेत. लेखणीवर टॅक्स, वह्या पुस्तकावर टॅक्स लावला आहे. स्मशाणभूमीवर लाकड्यांवर देखील कर लावण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा जिझीया कर गेला आहे. त्यामुळे त्यांची कार्यप्रणाली ही त्याच संदर्भातील आहे. ही राजकीय टीका आहे,” असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना कुठेही शब्दांचा तोल गेलेला नाही. फडणवीस हेच औरंगजेब आहेत असे मी म्हणालेलो नाही. त्यांनी तशीच वेशभूषा करावी आणि ते तसेच आहेत असे मी म्हणालो नाही. मी वैयक्तिक टीका केलेली नाही. मी राज्यकारभारावर टीका केली. ती करणं हा आमचा अधिकार आहे. केलेली टीका ही अतिशोयोक्ती प्रकारची नाही. ही महाराष्ट्राच्या अस्मितेवरची टीका असल्याचे भाजपचे प्रांताध्यक्ष बोलतात. मात्र जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या होते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का? स्वारगेट बसस्थानकामध्ये अत्याचार होतो तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का? परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये एकाचा मृत्यू होतो महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का?” असे सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केले आहेत.