DCM Ajit Pawar reaction to Agriculture Minister Manikrao Kokate controversial statement
नाशिक : महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्यामुळे रोज राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमधील अजित पवार गटाचे नाराज नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडल्यामुळे अनेक नेते नाराजी व्यक्त करत आहेत. अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणी वाढत आहेत. यानंतर आता पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत. तसेच काही गोष्टी या मनामध्ये ठेवायच्या असतात असा सल्ला देखील अजित पवारांनी त्यांना दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे म्हणून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की, “माणिकराव कोकाटेंना अजूनही गोष्टी मनात ठेवायची सवय नाही. आता मला जास्त महागात पडतंय. शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. याबाबत मी मागेही त्यांना सांगितलं होतं. शेतकरी हा बळीराजा आहे, आपला पोशिंदा आहे. सगळ्या गोष्टी आम्हालाही माहीत आहेत, आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून का दाखवायच्या? मनात ठेवायच्या”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकाच सुरु केली. ते म्हणाले की, “कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खातं दिलंय”, असं ते म्हणाले. कोकाटे यांच्या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मी असं काही बोललोच नाही, राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. फळबागांचं आणि कांद्याच्या पिकाचंही नुकसान झालं आहे. जेवढं नुकसान झालंय, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे, अशी सारवासारव त्यांनी केली. यावरुन खासदार संजय राऊत यांनी देखील महायुतीच्या नेत्यांना मलाईदार खाते हवे असल्याचे म्हणत निशाणा साधला.