नागपूरमध्ये नवरात्रीच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या योजनेची माहिती दिली आहे.
नागपूर : राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बांधकाम कामगार किट वितरण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील विविध मुदद्यांवर भाष्य केले. कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी महायुती कटिबद्ध असेल असे देखील फडणवीस म्हणाले आहेत. उपस्थित सर्व लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. बांधकाम कामगाऱ्यांना त्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या किटचे वाटप तसेच त्यांच्या सुखसुविधा पाहण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी एक योजना सुरु केली. यामध्ये नोंदी असलेल्या कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे किट दिले जाणार आहेत. ज्या वेळेस मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळेस ही योजना सुरु केली. यामध्ये कामगारांना एक कार्ड देण्यात आलं. हे कार्ड दाखवून जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध योजनांचा लाभ घेता येतो. यामध्ये भांडी कुंडी मिळतात, विविध किट मिळतात. तसेच पाच हजार रुपये मिळतात. एवढंच नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी आणि परदेशामध्ये जाण्यासाठी सुद्धा याच कार्डावर मदत म्हणून पैसे मिळतात. याच कारणामुळे आरोग्य विमा सुद्धा मिळतो. त्यामुळे कामगारांनी या सर्व प्रकारचे योजनांचा लाभ घ्यावा. आपलं सरकार जनसामान्याच्या आयुष्यात परिमाण करणारं सरकार आहे,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : आमच्याकडे काही कुणी दिल्लीतून येणार नाही….; जागावाटपावरुन संजय राऊतांचा टोला
त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे देखील कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, “आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी महिलांच्या खात्यांमध्ये दीड हजार रुपये जमा करणं सुरु केलं. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळीची भाऊबीज म्हणून एकत्रित पैसे देण्यात येणार आहे. लेक लाडकी योजनेंतर्गत सुद्धा आपण मुलीच्या जन्माचं स्वागत केलं. आज नवरात्रीचा दिवस आहे, आपल्या भगिनींना वाटलं पाहिजे, आपल्या कडे लक्ष्मी आली आहे. मुलींचे शिक्षण देखील मोफत केलं. मुलींना शिकवणार नाही त्यांना अर्थिक दृष्या विकसित करु शकणार नाही तोपर्यंत आपण विकसित भारत साकारु शकणार नाही. मुलींना पालकांनी सांगा, आम्ही फी भरू शकतं नसलो तरी त्यांचे मामा राज्य सरकार म्हणून बसले आहेत. ते तिच्या शिक्षणाचा खर्च करतील,” अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.