सौजन्य - नवराष्ट्र टीम
पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंगळवारी ( ता.७ ) मुंबई मधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. क्रांती अग्रणी डॉ जी. डी.( बापू ) लाड यांचे नातू आहेत.
सांगली जिल्ह्यातील नेतेमंडळींची भाजप मध्ये प्रवेश करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. मध्यंतरी विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील , कर्मवीर पतसंस्थेचे रावसाहेब पाटील यांनी भाजपमध्ये केला आहे. लाड यांच्या भाजप प्रवेश करण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसला आहे. लाड यांच्या प्रवेश करण्याच्या निर्णयाने जयंत पाटील गट नाराज झाला आहे. लाड यांच्या प्रवेशामुळे क्रांतिकारकांच्या वारसदारांना नेमकं झालं तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यंतरी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. यावरुन हा प्रश्न उपस्थित होत आहे.
लाड यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबतीने सुरु झाला आहे. शरद पवार व जयंत पाटील यांनी लाड यांची सांगली जिल्ह्याच्या युवक जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती. या कालावधीत लाड यांनी तरुणांना सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला. दरम्यान, कुंडल जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. गटनेते म्हणून निवड झाली. वडील अरुण लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची दोन वेळा निवडणूक लढविली. दुसऱ्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस, काॅग्रेस व समविचारी पक्षांच्या सोबतीने पदवीधर निवडणूक जिंकली. यामध्ये शरद लाड यांचे ‘ मायक्रो प्लॅनिंग ‘ पथ्यावर पडले. अरुण लाड विजयी झाले होते.
पदवीधर निवडणूकी होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी आहे. प्रशासनाने पदवीधर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवयाची या इराद्याने शरद लाड यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यानुसार नोंदणी केली आहे. आगामी निवडणूक भाजपकडून लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तशी पक्षश्रेष्ठींनी ‘ शब्द ‘ दिल्याने लाड हे पक्षप्रवेश करीत असल्याची चर्चा आहे.
यासाठी भाजप प्रवेश करणार
पलूस – कडेगांव मतदारसंघात काॅग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांंच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी लाड यांचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विश्वजीत कदम यांना विजयी करण्यामध्ये ‘ क्रांति ‘ परिवाराने महत्वाचा रोल बजावला होता. आमदार अरुण लाड यांना पदवीधर निवडणूकीत विजयी करण्यामध्ये कदम कुंटुबियांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याची परतफेड क्रांतीने विधानसभा निवडणुकीत केली. शरद लाड यांच्या पक्षप्रवेशाने भाजपला बळ मिळणार का? हे आगामी काळात दिसून येईल.