मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभाग रचनेस मंजुरी
मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यानंतर हालचालींना गती मिळाली आहे.
Share Market Today: बाजारात मंदीची चाहूल! गिफ्ट निफ्टीने दिले नकारात्मक संकेत, गुंतवणूकदार चिंतेत
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणार असून, सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २२७ प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली.
महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण ४९४ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींचा सविस्तर विचार करून नगरविकास विभागाने सुधारित आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर आयोगाने अंतिम मंजुरी देत संपूर्ण प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध केला आहे. या अंतिम आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या १ कोटी २४ लाख ३३७ असून, ती २२७ प्रभागांमध्ये विभागण्यात आली आहे. या प्रभाग रचनेनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुका कधी होणार, याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या वेळापत्रकासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. “आता कुणीतरी म्हणतील की, निवडणूक आयोगाशी माझी चर्चा झाली का? पण मी ४० वर्षे या क्षेत्रात घालवली आहेत. त्या अनुभवावरून सांगतो, दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया,” असे पाटील म्हणाले. निवडणुकीची तुलना करत त्यांनी म्हटले, “निवडणूक ही फास्ट ट्रेनप्रमाणे आहे; प्लॅटफॉर्मवर जो राहील तोच राहील.” तसेच, कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी सल्ला दिला की, “नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशिबाचंही योगदान महत्त्वाचं असतं.”
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली असून त्यासाठी प्रक्रिया राबवण्यासही सुरुवात केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तर त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे.