
उपमुख्यमंत्री शिंदेंनी अण्णा हजारेंच्या थेट गावी जाऊन घेतली भेट; 'हे' कारण ठरतंय चर्चेचं
राळेगणसिद्धी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची त्यांच्या राळेगणसिद्धी या गावी जाऊन सदिच्छा भेट घेतली. अण्णांनी राळेगणसिद्धी येथे केलेले जलसंधारणाचे उत्कृष्ट काम संपूर्ण देशवासियांसाठी दिशादर्शक आहे. याच ठिकाणी आता बांबू लागवड अभियान हाती घेण्यात येणार असून, या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अण्णा हजारे यांच्या भेटीबाबत सांगताना एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर म्हटले की, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून, इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यासंदर्भात मागणी करणारे निवेदन दिले. यासंदर्भात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन करून सदर काम स्वतः लक्ष घालून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. राळेगणसिद्धी गावातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शंभूराज मापारी याला डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने 25 हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, राळेगणसिद्धी येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मभूषण अण्णा हजारे यांचा जीवनपट ‘किसन हजारे ते अण्णा हजारे’ दाखवण्यासाठी केंद्र उभारण्याची मागणी केली. ही मागणीही तात्काळ पूर्ण करण्यासाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना सांगितले.
स्थानिक निवडणुकांचे वाजले बिगूल
राज्यात नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. स्थानिक स्तरावरील ही निवडणूक असल्याने या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच शिवसेना-भाजपा व मित्र पक्षांची महायुती होणार की नाही? असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोकणातही असेच काहीसे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: महायुती फुटणार? निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वबळाच्या तयारीत? बंडखोरीची शक्यता