DCM Eknath shinde press live on maratha reservation manoj jarange patil andolan
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरक्षणासाठी मागणीसाठी जरांगे पाटलांनी चलो मुंबईचा नारा दिला. आता जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये मराठ समाज असून यामुळे पोलिसांवर देखील ताण आला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “महायुतीचे सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. 10 टक्के आरक्षणाचा लाभ आजही मराठा समाजाला मिळतो आहे. त्याचबरोबर कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती आपण गठीत केली ती देखील आजही काम करत आहे,” अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “लाखो कुणबी नोंदी सापडल्या असून याचा फायदा मराठा समाजाला होतो आहे. त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून अनेक कोर्स आपण सुरु केले आहेत. आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील हजारो तरुणांना रोजगारांसाठी आपण बिनव्याजी कर्ज दिले आहे. त्याची मर्यादा 10 लाखापासून 15 लाख केली आहे. त्याचा फायदा देखील मराठा समाजाला होतो आहे. काही ठिकाण हॉस्टेल उभी राहिली असून काही ठिकाणी काम सुरु आहे,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
ही वस्तूस्थिती आहे
एकनाथ शिंदे म्हणाले की, “या सर्व योजनांचा लाभ घेत मराठा समाजाचे विद्यार्थी पुढे जात आहेत. शासन म्हणून आम्ही मराठा समाजासाठी जे काही प्रयत्न केले ते मराठा समाजासमोर आहे. यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. हाय कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं सुद्धा होते. मात्र नंतर महाविकास आघाडीच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये योग्य भूमिका मांडली नाही. ही वस्तूस्थिती आहे. ज्या पद्धतीने त्या आरक्षणासाठी प्रयत्न करायला हवे होते किंवा लक्ष द्यायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ते दिलं गेलं नाही,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र 10 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजातील बांधव आणि भगिनींना माझी एकच नम्र विनंती आहे की, जे जे समाजासाठी आम्हाला करता येईल ते ते आम्ही केलं आहे. यापुढे देखील करत राहू. परंतू समाजा समाजामध्ये कुठे तेढ निर्माण होणार नाही. ओबीसी समाजाचे कोणतेही आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची देखील भूमिका नाही. याचं काढून त्याला देणं हे करता देखील येणार नाही. यापुढे कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आणि नियमामध्ये बसणारे जे काही आहे ते मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न आहे,” अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले की, जे नियमामध्ये बसणारे आहे ते योग्य आहे. कायद्यामध्ये बसणारे आहे त्याबाबत विचार करण्यासाठी सरकार आजही सकारात्मक आहे. माझी आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा देखील झाली. जे काही देणं शक्य आहे मात्र कायद्याच्या चौकटीमध्ये असणार ते देण्याबाबत सकारात्मक आहे. कोणाचंही आरक्षण कमी न करता, कोणाचेही नुकसान न करता दिलं गेलं आहे. विरोधकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पाठिंबा आहे असं बोलत राहतात मात्र जेव्हा पण चर्चेसाठी बोलावलं जातं तेव्हा येत नाहीत. ही असली दुटप्पी भूमिका का घेता असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीबाबत उपस्थित केला आहे.