हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक; 'इथं' चक्क मशिदीत गणपती प्रतिष्ठापना
कुरुंदवाड / सुरेश कांबळे : कुरुंदवाड हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे जिवंत उदाहरण मानले जाते. शहरातील गणेशोत्सव आणि मोहरम हे सण गेल्या चार दशकांपासून धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम समाजबांधव शहरातील पाच मशिदीत दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे सेवा करतात. पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांच्या पिढीजात वारसांनी आजही तितक्याच श्रद्धेने अबाधित ठेवली आहे.
कुडेखान बडेनाल साहेब मशीद, ढेपनपूर मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद आणि कारखाना मशीद या पाच मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. १९८२ साली पीर-पंजा कमिटीचे कै. गुलाब गरगरे, कै. उस्मान दबासे, कै. दिलावर बारगीर, कै. मौला जमादार, कै. वली पैलवान, कै. रमजान घोरी आदींनी गणेशोत्सव आणि मोहरम एकाच वेळी आल्याने मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला. याच घटनेपासून शहरात धार्मिक एकात्मतेच्या या अनोख्या परंपरेची सुरुवात झाली.
२०१८ ते २०२० या तीन वर्षांत पुन्हा एकदा गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने शहरातील हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी एकत्रितपणे भक्तिमय वातावरणात हे सण साजरे केले. यावर्षी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापनेचे ४२ वे वर्ष साजरे होत असून, हा सलोख्याचा वारसा अधिक दृढ होत आहे. कुरुंदवाडमधील हे प्रेम एकतर्फी नसून दोन्ही समाज समभावाने एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होतात.
पिराला दाखवतात मोदकांचा नैवेद्य
मोहरमाच्या वेळी हिंदू बांधव पिराला मोदकांचा नैवेद्य दाखवतात, तर गणेशोत्सवात मुस्लीम बांधव रोठा, चोंगे व मलिद्याचा नैवेद्य अर्पण करून गणरायाच्या भक्तीत सहभागी होतात. राज्यात अनेक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या तरी कुरुंदवाडमधील ऐक्यावर त्याचा कधीच परिणाम झाला नाही. उलट मशिदीत होणाऱ्या गणपती प्रतिष्ठापनेचा आदर्श इतरांनी घ्यावा, असा संदेश कुरुंदवाडकरांनी दिला आहे.
गणरायाच्या सेवेत आम्ही मनापासून सहभागी
मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. गणरायाच्या सेवेत आम्ही मनापासून सहभागी होतो. कुरुंदवाडमध्ये हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र सण-उत्सव साजरे करतात, हीच खरी ताकद आहे. आम्ही सुरू केलेला सलोख्याचा वारसा पुढच्या पिढ्यांनीही तितक्याच श्रद्धेने जपावा, हीच आमची इच्छा आहे.
– इब्राहिम बारगीर.