
Harshvardhan Sapkal Criticized CM Devendra Fadnavis
Harshvardhan Sapkal : निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राहुल गांधींवर करण्यात येणाऱ्या टीकेवरून सवाल उपस्थित केला आहे. ‘फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का?’ असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही प्रश्न उपस्थित केल्याचा दाखला देत सपकाळ यांनी निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रश्नांना तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याऐवजी भाजपचे नेते राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पाच महिन्यांच्या कालावधीत आठ टक्के मतदार वाढल्याचा मुद्दाही राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता, असा दावा सपकाळ यांनी केला. यावरूनच फडणवीस राहुल गांधींच्या टीकेला वारंवार उत्तर देत असल्याचे सपकाळ म्हणाले.
Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
‘मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, अशी अवस्था फडणवीसांची झाली आहे. त्यांना आता प्रत्येक प्रश्नात राहुल गांधीच दिसतात,’ असा टोला सपकाळ यांनी लगावला. शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस उत्तरे द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असतील, तर त्याची उत्तरे आयोगाने द्यावीत. मुख्यमंत्र्यांनी आयोगाची बाजू मांडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे सपकाळ यांनी म्हटले.
तसेच दुष्काळग्रस्त जनतेला आर्थिक मदत कधी मिळणार, चारा छावण्या कधी सुरू होणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. या प्रश्नांवर ठोस पावले उचलण्याची मागणी करत सपकाळ यांनी, ‘हे प्रश्न सोडवणे जमत नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे,’ असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला.
Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा