
Dharmendra Pradhan
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टी यांच्यासह विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. आंदोलनांमुळे देशभरातील वातावरण तापलेले असतानाच आज (शुक्रवार, 16 ऑकटोबर) CJP कडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. (Dharmendra Pradhan)
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून निशाणा साधला. ते म्हणाले, “राष्ट्रीय हित, व्यवस्थेत सुधारणा करण्याचे दावे आणि विद्यार्थ्यांचे हित या नावाखाली सुरू झालेल्या आंदोलनांचे खरे स्वरूप आता कोणापासूनही लपलेले नाही. ‘सत्तापालट’ करण्यासाठीची उघड हाक आणि बांगलादेशकडून घेतलेली प्रेरणा यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, विद्यार्थ्यांच्या नावाखाली अराजकता पसरवण्याचा आणि राजकीय व्यवस्था अस्थिर करण्याचा हा एक हेतुपुरस्सर रचलेला कट आहे.
“परकीय शक्तींच्या मदतीने सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या देशद्रोही लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, भारतातील सत्तांतर केवळ लोकशाही प्रक्रियेद्वारेच निश्चित होते. त्यामुळे, भारतातील जनता हा अलोकतांत्रिक विचार कधीही स्वीकारणार नाही.”
Supreme Court : संजय राऊत आणि निखिल वागळेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाकडून अवमानना नोटीस जारी
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत प्रधान पुढे म्हणाले, “शंभर वर्षे पराभव पत्करलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी जनतेच्या कौलाचा वारंवार अनादर करत आहेत. काँग्रेस जेव्हा निवडणूक प्रक्रियेतून अपेक्षित निकाल लागत नाही, तेव्हा लोकशाही संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा आणि राजकीय फायद्यासाठी जनतेला दररोज त्रास देण्याचा प्रयत्न करणे, हे नेहमीच त्यांचे ध्येय राहिले आहे. हे त्याच लोकशाहीविरोधी काँग्रेसच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, जिने देशवासियांचे हक्क चिरडून टाकले.”
ते पुढे म्हणाले, “हातात संविधान घेऊन फिरणाऱ्या संविधानविरोधी राहुल गांधींना जनतेने वारंवार नाकारले आहे. तरीही, सत्तेच्या लालसेपोटी ते जनतेच्या जनादेशाचा अनादर करत आहेत आणि लोकशाहीच्या मूळ तत्त्वांनाच पायदळी तुडवत घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. राहुल गांधीजी, लोकशाहीबद्दलची तुमची द्वेषपूर्ण वृत्ती अत्यंत लज्जास्पद आहे!”
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी केलेले आरोप आणि विरोधकांची भूमिका यामुळे निवडणूक आयोगाभोवतीचा राजकीय वाद पुन्हा चर्चेत आला आहे.