
दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी घेतले राणेंचे नाव, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
मात्र या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादावर आता चर्चा रंगू आगळ्या आहेत. युक्तिवादादरम्यान आदित्य ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद करताना भाजप नेते नारायण राणे, तसेच त्यांचे दोन्ही पुत्र (नितेश राणे आणि निलेश राणे) तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वृत्तनिवेदक (अर्णब गोस्वामी) यांची नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच गरज भासल्यास एफआयआर दाखल करून पुढील तपास करता येऊ शकतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.
यावेळी, आदित्य ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला. दिशा सालियन यांच्या वडिलांबद्दल पूर्ण सहानुभूती असल्याचे सांगतानाच, याचिका राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला. या युक्तिवादादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांची मुले आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. राजकीय वैरातून विविध आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली असून ती तथ्यांवर आधारित नसल्याचा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला.
दिशा सालियन या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यानंतर हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही चर्चेत आले.
यानंतर तिचे मित्र आणि होणारा पती रोहन यांनी खोलीचा बंद दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिशा खोलीत आढळून आली नाही. खिडकीतून खाली पाहिल्यानंतर ती खाली पडलेली दिसल्याचे तपासात समोर आले.
दिशावर एका पार्टीदरम्यान बलात्कार झाला आणि ती गर्भवती होती, असाही दावा राणे यांनी केला होता. तसेच कथित घटनेच्या वेळी एका मंत्र्याचे सुरक्षारक्षक इमारतीबाहेर उपस्थित होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
याशिवाय, दिशा सालियन प्रकरणाची माहिती अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांचीही हत्या करण्यात आल्याचा आरोप राणे यांनी केला होता. मात्र, हे आरोप संबंधित तपास यंत्रणांकडून सिद्ध झालेले तथ्य म्हणून ग्राह्य धरलेले नाहीत.
मात्र, त्यानंतरही या प्रकरणातील आरोप आणि तपासाबाबत प्रश्न उपस्थित होत राहिले. आता दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
या याचिकेत दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. हायकोर्टाने या प्रकरणातील सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.