
‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन
Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापलं असताना मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली असली तरी जरांगे मुंबईकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत आंदोलनकर्त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
‘सरकार चार पावलं पुढे जात आहे, तसं मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. सध्या मुंबईत गणेशोत्सव सुरू असून लाखो गणेशभक्त आणि हजारो गणेश मंडळं उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे आंदोलनामुळे गणेशभक्तांची किंवा सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.
यापूर्वी मराठा समाजाचे ५८ मोर्चे मुंबईत झाले. लाखो लोक या मोर्चांमध्ये सहभागी झाले, मात्र इतर समाजाला किंवा नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती, असंही शिंदेंनी सांगितलं. त्यामुळे ‘मुंबईत येण्याच्या या निर्णयाचा पुनर्विचार करा,’ असं आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार सुरुवातीपासून सकारात्मक असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने मराठा समाजाला १० टक्के SEBC आरक्षण दिलं असून त्याचा लाभ विद्यार्थी आणि तरुण घेत आहेत. न्यायालयीन स्थगितीमुळे रखडलेल्या ५३०० जणांच्या नियुक्त्यांचाही शिंदेंनी उल्लेख केला.
कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी जस्टिस शिंदे समिती स्थापन करण्यात आली. लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्रं मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. सारथी, शिष्यवृत्ती, हॉस्टेल सुविधा आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
मनोज जरांगे यांच्या सरकारवरील टीकेवर बोलताना शिंदे म्हणाले की, लोकशाहीमध्ये सरकारवर टीका आणि आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या हिताची भूमिका कायम ठेवली पाहिजे आणि त्याला राजकीय रंग देऊ नये, असं त्यांनी म्हटलं.
मराठा समाजाला न्याय देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. काही मागण्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यांचा विचार आंदोलकांनीही केला पाहिजे, असं ते म्हणाले.
आता मनोज जरांगे मुंबईत दाखल झाल्यानंतर पुढील भूमिका काय घेतात आणि सरकार-आंदोलकांमध्ये पुन्हा संवाद होतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.