
"पिंपळनेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही...", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पिंपळनेर सटाणा मार्गाचे काँक्रिटीकरण, पिंपळनेर नगर परिषदेसाठी जलशुद्धीकरण आणि पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक निधी, अतिक्रमित घरांना नियमित करणे, नमो गार्डनासाठी २ कोटी, पांजरा नदीवरील घाट, पर्यटनासाठी, वीज केंद्र, कुस्तीसाठी मैदान अशी जी कामे आहेत त्यासाठी नगर विकास खात्यातून निधी दिला जाईल. आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत. पिंपळनेर नगरपरिषदेसाठी शिवसेनेच्या ललिता प्रेमानंद गायकवाड या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून सर्व २० जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. काहींनी मात्र दररोज आरोप केले पण आरोपांना टिकेला कामातून उत्तर दिलं. येथील मतदार घरातच सत्ता ठेवणाऱ्यांना धडा शिकवतील, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केली.
पिंपळनेर ग्रामपंचायतीची नगरपरिषद झालीय. शिवसेनेचे सर्व २० उमेदवार आणि नगराध्यक्षा ललिता गायकवाड निवडून नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावून सुरुवात करायचीय. आमदार मंजुळा गावित यांना १६०० कोटींचा विकास निधी दिला, असे ते म्हणाले. दिलेला शब्द पाळतो म्हणून लोकांचा विश्वास आहे, असे ते म्हणाले. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी शिकवण दिली, मात्र इथं जे १०० टक्के राजकारण करत आहेत त्यांचा येत्या निवडणुकीत १०० टक्के पराभव करायचाय, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पिंपळनेरकरांना दिले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून कार्यकर्त्याला निवडून द्यायला पाहिजे, असे ते म्हणाले. सत्ता येते आणि जाते पण नाव गेलं तर परत येत नाही. सगळ्या पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. सत्ता, संपत्तीपेक्षा माणसं किती कमवली हे आपल्यासाठी महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
डोंगराळे गावातील अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याबाबत ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती केली जाईल. ही केस फास्ट ट्रॅकवर चालवली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलंय. शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदात आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.