वाशिम जिल्हा पालिका निवडणुकीचा ज्वर वाढला! (Photo Credit - X)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य आणि राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य देत, भाजप युती असो वा काँग्रेस आघाडी, सर्वच पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरासह चारही नगरपालिका आणि मालेगाव नगरपंचायत क्षेत्रात गत अनेक वर्षांपासून विकास खुंटला आहे.
निधीचा चुराडा: शहरी भागाच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला, परंतु तत्कालीन पुढारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या निधीतून अपेक्षित विकास झाला नसल्याची ओरड नागरिक करत आहेत.
अपूर्ण प्रकल्प: शहरातील टेंम्पल गार्डन, तारांगण, नाट्यगृह हे प्रकल्प कोट्यवधींचा निधी खर्चून उभारले गेले, पण ते धुळखात पडून असल्याने या निधीचा चुराडा झाल्याचे बोलले जात आहे.
शहरातील नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर वसूल करणाऱ्या पालिका प्रशासनाने नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा पुरवणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वपक्षीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या सुविधा मिळू शकलेल्या नाहीत. आजही अनेक महत्त्वाच्या समस्या कायम आहेत:
पाणीपुरवठा: पिण्यायोग्य पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा होत नाही.
रस्ते: शहरात दर्जेदार अंतर्गत आणि प्रमुख रस्ते निर्माण झालेले नाहीत.
कचरा व्यवस्थापन: दैनंदिन कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही.
वाहतूक कोंडी: लाखो रुपये खर्चून उभारलेली सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित झालेली नाही, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.
या निवडणुकीत नशीब आजमावत असलेले उमेदवार या समस्यांवर तोडगा काढण्याची ग्वाही देत आहेत, तसेच शहराचा कायापालट करण्याची आश्वासने मतदारांना दिली जात आहेत.
मतदारांची अपेक्षा: नागरिकांकडून सर्व प्रकारचा कर भरूनही सुविधा न मिळाल्याने, यंदा स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारालाच पालिकेच्या सत्तेत पाठविण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे.
व्हिजनची चाचपणी: मतदार देखील शहर विकासाचे ‘व्हिजन’ (Vision) कोणत्या पक्षाकडे आहे, याची चाचपणी करीत असल्याचे चित्र आहे.
एकूणच, यंदा वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर येथील निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्यावरच रंगणार असल्याचा कयास राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
हे देखील वाचा: Local Body Election: चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली? ‘उबाठा’त दुफळी; निवडणुकीत काय होणार?






