'निवडणूक आयोगाविरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत धडक मोर्चा'; राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त घोषणा, ४ ऑक्टोबरला मोर्चा
निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाच्या विरोधात आज दुपारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मुंबईत येत्या ४ ऑक्टोबरला मनसे आणि ठाकरे सेनेच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली.
राज ठाकरे म्हणाले की, मी २०१७ मध्ये ईव्हीएमविरोधात भूमिका घेऊन मी अनेक नेत्यांची भेट घेतली होती. यावर आम्ही ४ तारखेच्या मोर्च्यात बोलूच पण, हा मोर्चा कोणत्या राजकीय पक्षाविरोधात नाही. गेल्या काही वर्षांत निवडणूक आयोगाकडून जो काही गैरकारभार सुरू आहे, त्याविरोधात हा मोर्चा असणार आहे. त्यामुळे सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावं,” असंही राज ठाकरे म्हणाले.
तसेच ४ तारखेच्या मोर्चानंतर पुढच्या रुपरेषेबाबत आम्ही नंतर ठरवू. पण ४ तारखेच्या मोर्चासाठी आम्ही सर्वच राजकीय पक्षांना यासाठी आमंत्रण देणार आहोत. हा मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाविरोधात नाही. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधातला हा मोर्चा आहे. लोक रस्त्यावर येतील तेव्हा निवडणूक आयोगाला समजेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला .
निवडणूक आयोगावर होणाऱ्या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे, असे विचारले असता, “खाई त्याला खवखवे आम्ही निवडणूक आयोगावर बोलतोय, त्याचा भाजपाला त्रास का होतोय?” असा खोचक टोलाही राज ठाकरे यांनी भाजपाला लगावला.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मतदार याद्यांमधील कथित गोंधळावर जोरदार निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्याकडे केवळ राजकीय जय-पराजयाच्या चौकटीतून न पाहण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ३० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, निवडणूक आयोगाविरोधात राष्ट्रीय स्तरावर पुढील रणनीती काय असावी यावर सविस्तर मंथन होणार आहे. तत्पूर्वी, ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंनी एकत्र येत ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भायखळा ते बीएमसी मुख्यालयादरम्यान भव्य संयुक्त महामोर्चा काढण्याची मोठी घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापले असून, या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






