
'पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा'; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा
सातारा : निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करून काँग्रेसकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मतदान प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी काँग्रेसने आपल्या पराभवाची कारणे शोधून आत्मपरीक्षण करावे. एसआयआर प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या आरोपांमधील विसंगती समोर आली आहे, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.
सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते. शिवेंद्रराजे म्हणाले, ‘‘केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एसआयआरची प्रक्रिया एकमताने सुरू असल्याचेही आयोगाने सांगितले आहे. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करून एक विशिष्ट राजकीय कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’
कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाचा दाखला देत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘विजय मिळाल्यानंतर लोकशाहीचा विजय झाला असे सांगायचे आणि पराभव झाल्यानंतर मतदान यंत्रणा किंवा निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करायचा, अशी भूमिका योग्य नाही. काँग्रेसने आपल्या कारभाराचे आत्मपरीक्षण करावे,’’ असे ते म्हणाले.
‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
मतदार याद्यांच्या पुनरावलोकनासाठी सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरही त्यांनी भाष्य केले. मतदार याद्या अधिक अचूक करण्याच्या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याची संधी आहे. त्यामुळे या प्रक्रियेबाबत गैरसमज निर्माण करण्याऐवजी त्यामध्ये सहभागी होऊन त्रुटी निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. फॉर्म क्रमांक सहाबाबतही संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संविधानिक संस्थांवर आरोप करताना दुसरीकडे संविधानाचा उल्लेख करणे ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली.
आत्मपरीक्षण करण्याची गरज
देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करण्याऐवजी जनतेचा कौल स्वीकारून संघटनात्मक आणि राजकीय पातळीवर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे शिवेंद्रराजे म्हणाले.
‘मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न’
कॅबिनेट सचिवांचे पत्र हे डेप्युटेशनवरील नियुक्त्यांशी संबंधित होते. मात्र, त्याचा वेगळा अर्थ काढून विरोधकांकडून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवेंद्रराजे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला राजकीय पातळीवर थेट आव्हान देता येत नसल्याने काँग्रेसकडून विविध मुद्द्यांवरून संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.