Sangli Politics : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग; मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लागले लक्ष... (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सांगली : महापलिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचे रणशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत सांगलीत शनिवारी (दि.3) फुंकले जाणार आहे. येथील स्टेशन चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीरसभा होणार असून, त्याची जय्यत तयारी सुरु आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहराच्या विकासाबाबत मुख्यमंत्री नेमके काय बोलणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आजपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्याचे चित्र आहे. प्रचाराचा शुभारंभ सांगलीतील गणपती मंदिरासमोर करण्यात येणार असून, त्यानंतर प्रचाराचा नारळ फोडून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. ही पदयात्रा पटेल चौक, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात पोहोचणार असून, तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
हे देखील वाचा : “मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
या सभेला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिका क्षेत्रातील भाजपचे सर्व उमेदवार, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
महापालिका निवडणुकीत भाजपने शहर विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सोयी-सुविधा हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आपल्या भाषणातून सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासोबतच सांगली शहरासाठी भविष्यातील विकासाचा आराखडा मांडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे केवळ भाजप कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांचेही लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेने भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात होणार असून, आगामी काळात शहरात प्रचाराची रणधुमाळी आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेदेखील वाचा : “जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले






