
Sanjay Raut Claims RSS Pushing Fadnavis to Delhi as Deputy PM.
मुंबई : राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गोविंद गिरी महाराज यांची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का? ज्यांचे नाव तुम्ही घेत आहात, ते राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. ते त्या पदावर असताना राम मंदिराची तिजोरी लुटली गेली. अशा परिस्थितीत त्यांची जबाबदारी निर्माण होत नाही का? सर्वाधिक जबाबदारी कोषाध्यक्षाचीच असते, असेही खासदार राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, शनिवारी (दि.18) सायंकाळी 4.30 वाजता नागपुरातील रामनगर येथील राम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नागपुरात होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळच आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे हे आमचे कर्तव्य आहे. नेता म्हणून नव्हे, तर रामभक्त म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित करत आहोत.
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी 1992 च्या कारसेवेत सहभागी झाल्याचा दावा केला आहे. त्याचा आम्हालाही अभिमान आहे. त्यामुळे अशा रामभक्ताने या रामरक्षा पठणात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. ते रामभक्त म्हणून आले, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. नागपुरातील हिंदुत्ववादी संघटना, मोहन भागवत यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनाही आम्ही निमंत्रण देत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
राम मंदिरातील चोरी भावनांना तडा देणारी
राम मंदिरातील चोरी ही रामभक्तांच्या भावनांना तडा देणारी घटना आहे. या घटनेचा धक्का देवेंद्र फडणवीस यांनाही बसला असेल. त्यामुळे रामभक्तांना जागृत करण्यासाठी आम्ही जी रामसेवा करत आहोत, त्यात त्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गोविंद गिरी महाराजांबाबत संजय राऊत म्हणाले…
महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का? ज्यांचे नाव तुम्ही घेत आहात, ते राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. ते त्या पदावर असताना राम मंदिराची तिजोरी लुटली गेली. अशा परिस्थितीत त्यांची जबाबदारी निर्माण होत नाही का? सर्वाधिक जबाबदारी कोषाध्यक्षाचीच असते. ते कोषाध्यक्ष असताना कोट्यवधी रुपयांची लूट झाली. एसआयटीच्या अहवालातही त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. ते म्हणतात, पुण्यातून ऑडिटर पाठवत होतो. एवढ्या मोठ्या आणि हिंदूंच्या अस्मितेशी निगडित मंदिराचा कारभार पुण्यातून ऑडिटर पाठवून चालतो का?