'लाडकी बहीण योजनेत 3515 कोटी रुपयांचा अपहार,' संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, लवकरच कायदेशीर पावले उचलणार?
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ई-केवायसी (e-KYC) आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रियेनंतर 92 लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळल्याचा दावा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
तसेच, लाडकी बहीण योजनेतील पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊत कायदेशीर पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी ‘राज्य सरकारने 92 लाख लोकांची मते विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करून 3515 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोपदेखील केला.
यावेळी राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर जोरदार टीका केली. “92 लाख लोकांची मते विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीतील हजारो कोटी रुपये वापरले जात आहेत. आश्रमशाळांना निधी नाही, दिव्यांगांचे अनुदान रखडले आहे, पण मतांसाठी हजारो कोटी खर्च केले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कायदेशीर पाऊल उचलण्याचे संकेतही त्यांनी दिले.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आहे. त्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गट हे अमित शाह यांचे पक्ष आहेत. त्यांच्यात काय सुरू आहे, यावर आम्ही का बोलावे?”
ते पुढे म्हणाले की, शरद पवार हे महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते आहेत. पक्षातील घडामोडींवर लक्ष असणे स्वाभाविक आहे. नुकतीच सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या या अफवा असल्याचे सांगितल्याचा दावा राऊत यांनी केला.
ते म्हणाले, “सगळेच पक्ष यावेळी अडचणींतुन प्रवास करतायत. शिवसेनेपुढे, शरद पवार साहेब, सुनेत्रा पवार जो गट सांभाळतायेत ते सुद्धा अडचणीत आहे. ज्या अनाकडे प्रचंड बहुमत आहे, ते अडचणीत नाहीत असं नाही. आम्ही आमच्या पक्षपुरता बोलू. आमचा मार्ग कसा व्यवस्थित होईल यावर काम करू. शरद पवार महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाच्या अडचणी दूर करण्यासाठी ते समर्थ आहेत. अडचणी बाह्य शक्तींकडून निर्माण केल्या जात आहेत. या बाह्य शक्ती म्हणजे मोदी आणि शाह आहेत.”
दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील हे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचे नेते असून ते वेगळा राजकीय मार्ग स्वीकारतील, असे वाटत नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.






