अनवधानाने नाव राहिले, एवढा वाद कशासाठी?" ; गिरीश महाजनांच्या स्पष्टीकरणाने नव्या वादाची ठिणगी
Nashik Politics: नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका महिला वनअधिकाऱ्याने उघडपणे आक्षेप घेतला. गिरीश महाजनांनी भाषणादरम्यान इतर अनेक नेत्यांची नावे घेतली, पण संविधान निर्मात्याचे नाव कसे विसरले असा जाब त्यांनी थेटपणे विचारला. यामुळे काही वेळासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी चांगला गोंधळ उडाला होता.
पण या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहे. गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींवर अखेर गिरीश महाजन यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केलं. पण त्या भूमिकेवरही आता टीकेची झोड उठू लागली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. “मी बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक असून, केवळ अनवधानाने नाव घ्यायचे राहून गेले असेल, तर त्यावर एवढा गदारोळ कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी महाजन यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील अनुभवांचा दाखला दिला. ते म्हणाले की, “गेल्या ४० वर्षांपासून मी प्रत्येक जयंतीमध्ये पुढाकार घेतो. इतर नेते केवळ हार घालून जातात, पण मी प्रत्यक्ष सहभागी असतो. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा मीच उभा केला आहे. मी संघाच्या मुशीत वाढलो असलो तरी माझं राजकारण सर्वसमावेशक आहे.” गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर बोलताना महाजन म्हणाले, “मी दलितांच्या पंगतीत बसून जेवणारा माणूस आहे. मी कधीही भेदभाव केला नाही. आता लोक ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करत आहेत, पण हे कशासाठी? या प्रकरणावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.”
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहणानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थितांना संबोधित करत होते. भाषणादरम्यान त्यांनी विविध महापुरुषांचा उल्लेख केला, मात्र संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव त्यांच्याकडून सुटले. हे लक्षात येताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट व्हीव्हीआयपी कक्षाकडे धाव घेतली आणि घोषणाबाजी सुरू केली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माधवी जाधव यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या बाबासाहेबांचे नाव भाषणात का नाही? मी त्यांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. पालकमंत्र्यांनी त्यांची चूक मान्य करावी”.






