
दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी सपकाळांची मागणी
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा खंड आणि पिकांचं नुकसान यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. याच मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
“राज्यातील अनेक भागात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही नाही, शेतातील पिके करपून गेली आहेत. पण महायुती सरकारचे त्याकडे लक्ष नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त चर्चा पण ठोस निर्णय घेतला नाही, पालकमंत्री शेतकऱ्यांकडे फिरकले नाहीत. शेतकऱी संकटात असताना सरकार वेळकाढूपणा करत आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत, सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, “असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
दुष्काळावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “भाजपा महायुती सरकार संवेदनशील नाही. शेतकरी संकटात होरपळून निघाला असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कुंभमेळ्यात सीसीटीव्ही बसवण्यासाठी सरकार ३५० कोटी रुपये खर्च करते पण शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची गरज असताना तोही निर्णय घेतला नाही. जनतेमध्ये महायुती सरकारबद्दल प्रचंड चीड आहे पण सत्ताधारी निर्ढावलेले आहेत. त्यांना शेतकरी, सर्वसामान्य जनता यांचे काहीही देणेघेणे नाही. यांना फक्त भ्रष्टाचार व टक्केवारी यामध्येच स्वारस्य आहे. अजून वेळ गेलेली नाही, सणासुदीचे दिवस आहेत, सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करुन दसऱ्याच्या आधी भरीव मदत द्यावी,” असे सपकाळ म्हणाले.
Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षात काय दिवे लावले म्हणून त्यांच्या वाढदिवसाला दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या काळात तरुणांना नोकऱ्या नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, महागाई गगणाला भिडली आहे, अशा परिस्थितीत वाढदिवस काय साजरा करता. जनता संकटात असताना वाढदिवस साजरे करणे हे अशोभनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सोने खरेदी करु नका, परदेशात जाऊ नका, तेल कमी वापरा, काटकसर करा असे आवाहन केले होते आणि आपल्या वाढदिवसाला तेलाचे दिवे लावा असे सांगतिले, हा प्रकारच संतापजनक आहे. आत्मपूजा करण्याचा हा प्रकार आहे. देशाला इतका खोटारडा, रंग बदलणारा पंतप्रधान मिळाला हे दुर्दैव आहे,” असे ते म्हणाले.
“निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचे हस्तक बनला आहे. एसआयआर च्या माध्यमातून मतदानाचा हक्कच हिरावून घेतला जात आहे, हे लोकशाहीवरचे मोठे संकट आहे. निवडणूक आयोगाचा कारभार हा अराजकाकडे घेऊन जात आहेत, याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून देशात लोकशाही नांदावी यासाठी काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढत आहे,” असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.