सौजन्य - सोशल मिडीया
पिंपरी : राज्याच्या विविध भागांत दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरात दिवा लावण्यासाठी तेल नाही, मात्र दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत सत्ताधारी काजू-बदाम खात असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. खासदार संजय जाधव काजू-बदाम खातानाच्या व्हिडीओवरुन त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शिवेसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या अशाच वक्तव्यामध्ये दानवे यांनीही आपला सूर मिसळला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळे, शिवसेना शाखा, पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या शनिवारी दानवे यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे बैठक झाली. या बैठकीत खासदार संजय जाधव काजू-बदाम खात असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याचा दावा दानवे यांनी केला. ‘‘दुष्काळात शेतकऱ्यांची अवस्था बिकट असताना लोकप्रतिनिधींचे असे वर्तन दुर्दैवी आहे. अल्पोपहार घेण्यास हरकत नाही; मात्र काजू-बदाम खाणाऱ्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
‘‘ब्रिटिशांच्या काळात नागरिकांवर अन्याय होत होता. त्याच पद्धतीने सत्तेतील लोक जनतेशी वागत असल्याचे चित्र दिसत आहे. असंवेदनशील लोकप्रतिनिधी निवडून येणे हे राज्याचे दुर्दैव आहे,’’ अशी टीकाही दानवे यांनी केली. राज्यातील शेतकरी संकटात आहे. अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, धो-धो पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जनता धडा शिकवो, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली, असे दानवे यांनी सांगितले.
काजू बदामावरून संजय शिरसाटही संतापले
नांदेड येथे मराठवाडा विभागीय दुष्काळ आढावा बैठकीदरम्यान नेत्यांच्या ताटात काजू-बदाम ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीत, जिथे खरीप हंगाम वाया गेला आहे आणि शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत, अशावेळी अधिकाऱ्यांनी हा अनावश्यक पाहुणचार केल्याने नेत्यांना बदनामी सहन करावी लागते, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. यात संजय जाधव यांच्या काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ विशेषतः व्हायरल झाला. शिरसाट यांनी या कृतीला पाहुणचार नसून, अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली गैरकृत्ये ठरवले आणि ते विभागीय आयुक्तांशी या संदर्भात बोलणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत असताना आणि शेतकरी साधी चटणी-भाकरी खाऊन दिवस काढत असताना, नेत्यांच्या ताटात दिसलेल्या काजू-बदामामुळे सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.






