
हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा दाखला देत सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशाला मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, या स्वातंत्र्य चळवळीशी ज्यांचा संबंध नव्हता, त्याच शक्ती आज देश आणि राज्याच्या सत्तेत आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला. संविधान न मानणाऱ्या आणि पूर्वी तिरंग्याला विरोध करणाऱ्या शक्तींनी स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबाबत देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधान स्वीकारावे तसेच संघाची नोंदणी करून त्याला मिळणाऱ्या देणग्यांचा हिशोब देशासमोर मांडावा, असेही सपकाळ म्हणाले. देशात संविधान आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचाही सपकाळ यांनी उल्लेख केला. संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत असून, त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. विशेषतः तरुणांचा मोठा सहभाग या लढ्यात दिसत असल्याचे ते म्हणाले.
देशात स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव होत असल्याबद्दल सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोप करत, संबंधितांवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, यंदाचे वर्ष काँग्रेससाठी संघटन बांधणीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गावपातळीवर ग्रामशाखा उभारण्यासह मंडळ, ब्लॉक, प्रभाग आणि वॉर्ड पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा संकल्प असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सपकाळ यांनी लाल किल्ल्यावरून करण्यात येणाऱ्या घोषणांवरही टीका केली. मागील काही वर्षांत करण्यात आलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले, “आज लाल किल्ल्यावरून तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा करण्यात आल्या पण मागील १२ वर्षात अशाच दिलेल्या घोषणांचे काय झाले, याचा विचार केला पाहिजे. लाल किल्ल्यावरूनही खोटी आश्वासने देऊन देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे.”
“महिलांना आरक्षण दिले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची आधीपासूनची भूमिका आहे आणि २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक संसदेत सर्व संमतीने मंजूर झाले आहे पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावरून जनतेची दिशाभूल करणे थांबवा,” असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.