
"हिंदी भाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला" उबाठाच्या दुटप्पीपणावर उद्योग सामंत यांची सडकून टीका
मंत्री सामंत म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यात जाणीवपूर्वक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. अंगणवाडी, बालवाडी, शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय बदल करावेत यासंबधी माशेलकर समितीने अहवाल सादर केला होता. या अहवालात जितक्या शिक्षण संस्था आहेत तिथं मराठीतून अध्ययनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण विकसित केले गेले आहे. त्याचबरोबर इंग्रजी आणि हिंदीचे अध्यापन अनिवार्य केले पाहिजे, तसेच महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन ते चार वर्षांतही इंग्रजीबरोबर हिंदी अनिवार्य, सक्तीचे केले पाहिजे, असा या अहवालात उल्लेख आहे. हा अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता. त्यामुळे हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंनीच घेतला, असा दावा मंत्री सामंत यांनी केला.
महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर हिंदी सक्ती बाजूला करुन ऐच्छिक करण्याचे काम केले. मात्र विरोधकांनी हिंदी सक्तीबाबत फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली. २५ वर्ष मराठीचा मुद्दा, मुंबई तोडणार या पलिकडे भाषणं त्यांनी केली नाही. मराठीचा मुद्दा काढताना अदानींचा जप करायचा. परवाच्या सभेत राज ठाकरेंनी अदानींचे कितीवेळा नाव घेतले. अदानींना धारावीचा पुनर्विकास करण्याचे काम देण्यासाठी पहिले टेंडर का रद्द केला, हा प्रश्न राज ठाकरे यांनी उबाठाला विचारायला हवा होता, असे सामंत म्हणाले.
राज्यात मराठी उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती योजनेत मविआ काळात दोन वर्षात फक्त ७००० मराठी उद्योजक तयार केले. मात्र महायुतीच्या काळात साडेतीन वर्षात राज्यात ६२ हजार मराठी उद्योजक तयार करण्यात आले, असे मंत्री सामंत म्हणाले. मागील २५ वर्षात मुंबईतून ४० लाख मराठी वसई विरार, कल्याण बदलापूर अंबरनाथ इथं गेला. या ४० लाख मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम महायुती करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आई वडिलांबद्दल बोलणं हे मराठी संस्कार नाहीत. काँग्रेससोबत जाऊन त्यांचा गुण लागला, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी कोणाचाही बदनामी न करता प्रचार सभा केली हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे, असे मंत्री सामंत म्हणाले. अदानींच्या नावे टाहो फोडून आपण मराठी माणसांचे उद्धार करणारे आहोत असा काहीजणांचा प्रयत्न आहे. मराठी माणूस मुंबईत सन्मानानेच राहणार ही उपमुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका आहे. १६ जानेवारीला मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.