प्रभाग क्रमांक १८ (वानवडी - साळुंखेविहार) मधील काँग्रेस अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद (फोटो - सोशल मीडिया)
PMC Elections 2026 : पुणे : ‘केंद्रात, राज्यात व महानगरपालिकेतही (PMC Elections 2026) सत्ता असताना भाजपला कोणत्याही प्रकारचा विकास करता आला नाही. उलट सत्तेत असताना भ्रष्टाचार व गुन्हेगारांना पोसण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचेच काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. विकासाचा कोणताही अजेंडा नसल्याने भाजपचे (bjp politics) वाचाळवीर नेते वादग्रस्त विधान करण्यात मश्गुल आहेत. भाजपच्या एका माजी मंत्र्यांनी माझ्याविरोधात केलेले वादग्रस्त विधान त्याचेच उदाहरण आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपने विकासावर बोलावे. मुद्द्यावरची निवडणूक गुद्द्यावर घेऊन जाऊ नका, जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिला.
पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ (वानवडी – साळुंखेविहार) मधील काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, ॲड. साहील केदारी आणि शमिका जांभुळकर या चारही उमेदवारांनी सोमवारी भव्य बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या वेळी रॅलीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद व होणारे स्वागत पाहून चारही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
हे देखील वाचा : पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
बधाई चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. तिथून रिम्स स्कूल, केदारीनगर, संविधान चौक, रुबी हॉल हॉस्पिटल चौक, शेवकर वस्ती, होले मळा या मार्गे निघालेल्या रॅलीचा जगताप चौकात शेवट करण्यात आला.
हे देखील वाचा : महायुतीच्या सभेमध्ये रवींद्र चव्हाणांचा लुंगी लूक; रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा घणाघात
यावेळी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप म्हणाले की, ‘मी आणि माझे कुटुंब जवळपास मागील २५ वर्षांपासून राजकीय जीवनात सक्रिय आहे. या काळात नेहमीच वानवडी – साळुंखे विहार भागातील नागरिकांनी मतांच्या माध्यमांतून भरभरून प्रेम दिले आहे. त्या सर्व मतदारांचा मी कायम ऋणी असून मी आजवर वानवडी – साळुंखे विहार भागाची सेवा करीत आलो आहे. येत्या काळात देखील सेवा करीत राहणार आहे. आपल्या भागाचा येत्या काळात कायापालट करणार आहे. त्यासाठी मतदार आम्हा चारही काँग्रेस उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.






