
आघाडीबाबत वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'प्रत्येकाने दोन पावले मागे घेऊन...'
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. “जिथे शक्य तिथे आघाडी करा असा आदेश आहे. भाजपला आघाडी केलेले पक्ष सोडून आम्हाला समविचारी पक्षाशी आघाडी करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. मुंबई येथे देखील स्थानिक नेत्यांना अधिकार दिले गेले आहेत. त्यामुळे आज किंवा उद्यामध्ये अंतिम निर्णय होईल. जागा वाटपात आकडेवारी इकडे-तिकडे होऊ शकेल. प्रत्येकाने दोन पाऊले मागे घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे”.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, मी त्या प्रक्रियेत नाही. त्यामुळे मुंबईच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर सांगू शकेल. दुसऱ्याच्या घरात काय चाललं तो डोकावण्याचा अधिकार मला नाही. पण दोन्ही राष्ट्रवादींच्या चर्चा खूप पुढे गेल्यांचं मी ऐकलं आहे. घड्याळ किंवा तुतारी यावरून लढण्याचा त्यांचा विषय होता. त्यांच्या बैठका झाल्या तेव्हाच आम्ही निर्णय घेतला. जर शरद पवार अजित पवार यांच्यासोबत जात असतील तर आपला पक्ष स्वतंत्र लढेल हा निर्णय आमच्या पक्षाने जाहीर केला आहे.
दरम्यान, त्यांनी काय करायचं तो त्यांचा अधिकार आणि आम्ही काय करायचं तो आमचा अधिकार आहे. सध्या राज्यात राजकारणाचा झालेला चिखल त्यामुळे सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहे. कितीही धुतलं तरी ते डाग पुसले जातील, असं दिसून येत नाही.
ज्योतिष्याकडे जाऊन खात्री केली पाहिजे
याशिवाय, कोणाला काय म्हणायचे ते त्यांचा प्रश्न मी यावर काय बोलणार. मात्र, सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहू दोष किंवा शनिदोष आहे का? याची खात्री त्यांनी ज्योतिषाकडे जाऊन करून घेतली पाहिजे. प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये आहेत. आम्ही त्यांना शब्द दिला आहे. आणि तो आम्ही पाळणार आहोत. तिकडे द्यायची की नाही तो त्यांचा पक्ष, आणि आम्हाला द्यायचे नाही तो आमचा अधिकार आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. त्यांना आम्हाला विचारायचा अधिकार नाही.
हेदेखील वाचा : Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा