
Maharashtra Politics: अपक्ष वाढवणार टेंशन; वाई, साताऱ्यात मैत्रीपूर्ण लढती तर...
सातारा जिल्ह्यात अपक्ष उमेदवार वाढवणार टेंशन
वाईत फॉर्म भरणीच्या अंतिम दिवशी राजकीय गडबड
भाजपाचे ६० ठिकाणी झेडपीसाठी तर ११८ ठिकाणी उमेदवार
सातारा: अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी होता. सकाळपासून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केल्याने अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी झाली होती. सातारा जिह्यात भाजपाने तब्बल ६० ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरले असून पंचायत समितीसाठी ११८ ठिकाणी अर्ज भरले आहेत. शिंदे गटाचे नेते एबी फॉर्म वाटून चक्क आजारी पडल्याने माहिती समजू शकली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने १८ जिल्हा परिषद गट आणि २६ गणात उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजितदादा गटानेही अर्ज मोठया संख्येने भरलेले आहेत. त्यांची आकडेवारी समजू शकली नाही. दरम्यान, अर्ज छाननी दि. २२ रोजी असून दि. २३ ते २७ दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने त्या दरम्यान निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अंतिम दिवशी राजकीय गड
वाई येथे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी फॉर्म भरणीच्या अंतिम दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चार गटासाठी ३६ अर्ज तर पंचायत समिती आठ गणासाठी ४५ उमेदवार रिंगणात असून एकूण अपक्षांसह ८१ अर्ज दाखल झाले आहेत. वाई तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना (उद्धव/शिंदे गट) तसेच अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
बुधवार दि. २१ रोजी सकाळी आकरा वाजेपासून तहसील कार्यालय व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्ते, उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात रंगून गेला होता. तसेच प्रत्येक पक्षाने उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करून भरले. अंतिम क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची चुरस सुरू होती.
Ratnagiri Zp Election: आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यात बंडखोरी; हजारपर्यंत उमेदवारी अर्ज…
दरम्यान, अपक्ष उमेदवारांचीही लक्षणीय संख्या असल्याने अनेक मतदारसंघांत ते निर्णायक भूमिका बजावतील, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती तर काही ठिकाणी थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. आता उमेदवारी अर्ज छाननी, माघारी आणि चिन्ह वाटपानंतर प्रचाराला वेग येणार असून, वाई तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या संघर्षामुळे अधिक रंगतदार ठरणार आहे.