नगरसेविका Sahar Sheikh यांच्या वादग्रस्त विधानावर नवनीत राणांचे चोख प्रत्युत्तर (Photo Credit- X)
मुंब्र्यातील विजयानंतर सहर शेख यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना नवनीत राणा एका कार्यक्रमात म्हणाल्या, हा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा देश आहे. ‘मुंब्रा हिरवा करू’ ही तुमची स्वप्ने कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत. माझ्यासारखे शिवबांचे भक्त आणि कार्यकर्ते जिवंत असेपर्यंत या देशातून कोणीही भगवा हटवू शकत नाही. आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत.
जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत मुंब्रा प्रभाग ३० मधून विजयी झालेल्या सहर शेख यांनी एका विजयी मिरवणुकीत आक्रमक भूमिका मांडली होती. त्या म्हणाल्या होत्या की, येत्या काळात संपूर्ण मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकू आणि संपूर्ण मुंब्रा ‘हिरवा’ होईल. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
“मुंब्र्याला हिरवं करायचं आहे…”; AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस
वातावरण चिघळू नये यासाठी मुंब्रा पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ नुसार पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना नोटीस बजावली आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आणि सोशल मीडियावर बोलताना संयम बाळगण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक राहिलेल्या युनूस शेख यांच्या कन्या सहर शेख यांनी मुंब्र्यात एमआयएमचा झेंडा फडकावला आहे. विजयानंतर त्यांनी आव्हाडांना उद्देशून विचारलेला “कैसा हराया..?” हा प्रश्न सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एमआयएमने यंदाच्या महापालिका निवडणुकीत १३ शहरांमध्ये १२५ जागा जिंकत मोठी झेप घेतली असून, ठाण्यातही ५ जागांवर विजय मिळवला आहे.
सहर शेख या मुंब्र्यातील प्रभावशाली नेते युनूस शेख यांच्या कन्या आहेत. आव्हाडांची साथ सोडून एमआयएममध्ये प्रवेश करणाऱ्या युनूस शेख यांनी आपल्या मुलीच्या माध्यमातून आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात मोठे खिंडार पाडले आहे. आता या वादात नवनीत राणा यांनी उडी घेतल्याने हा संघर्ष धर्म आणि रंगांच्या राजकारणाकडे वळताना दिसत आहे.






