
‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
केडीएमसीची निवडणूक होऊन सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. निवडणुकीनंतर नियमानुसार ठराविक कालावधीत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती अथवा निवड होणे अपेक्षित असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
त्यामुळे ही प्रक्रिया आणखी प्रलंबित ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना लेखी पत्र दिले आहे. आगामी महासभेच्या कामकाजात स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय घेऊन त्यावर निर्णय घ्यावा आणि त्याची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
महासभेत या विषयावर कोणताही निर्णय न झाल्यास ठाकरे गट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा बोरगावकर यांनी दिला आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांचा विषय आता प्रशासकीय पातळीबरोबरच कायदेशीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वीकृत नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजात सहभाग मिळत असल्याने त्यांच्या नियुक्तीला राजकीयदृष्ट्याही महत्त्व आहे. त्यामुळे नियुक्तीची प्रक्रिया कधी पूर्ण होते, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष आहे.
ठाकरे गटाने थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यामुळे आगामी महासभेत प्रशासन हा विषय अजेंड्यावर घेणार का आणि नियुक्तीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे आता कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Ulhasnagar Traffic Jam : वाहतूक कोंडीने गाठली परिसीमा! रुग्णालय गाठण्याआधीच रिक्षेत महिलेची प्रसूती