
रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुती सज्ज
रहिमतपूर : रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून रहिमतपूरमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या माध्यमातून एकत्रित येत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यात येणार असल्याची माहिती भाजप महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या 25 वर्षांत रहिमतपूर नगरपालिकेचा विकास झाला नाही. सर्वसामान्य लोकांचा विकासाचे समाजकारण करण्यासाठी आम्ही एकत्रित येऊन रहिमतपूर नगरपालिकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून करण्याची ठरवले आहे. यामध्ये भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष संपतराव माने, विरोधी पक्ष नेते निलेश माने, माजी नगराध्यक्ष शिवसेना नेते वासुदेव माने व राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सचिन बेलागडे, भाजपमध्ये प्रवेश केलेले विक्रम सिंह माने, विकास तुपे यांच्यासहित सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेत महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक होणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: महायुती फुटणार? निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वबळाच्या तयारीत? बंडखोरीची शक्यता
गेली 25 वर्षे रहिमतपूर नगरपालिकेचा म्हणावा तसा विकास झाला नाही. सध्या देशात भाजपप्रणित एनडीएचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या विकासासाठी अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्या योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत. मात्र, रहिमतपूरमध्ये गेली 25 वर्षांपासून सत्ता असलेल्या नेतृत्वाकडून म्हणावा तेवढा विकास झाला नाही. रहिमतपूरमधील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत.
नगरपालिकेत सत्ता नसतानाही गोरेंनी…
नगरपालिकेत सत्ता नसतानाही जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे व जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून रहिमतपूरमध्ये विकासकामे खेचून आणण्यात आम्ही कमी पडलो नाही. गेल्या पाच वर्षात सत्ता असो वा नसो, परंतु शहराच्या विकासासाठी योगदान देण्यात आमचे सहकारी कमी पडले नाहीत. यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत रहिमतपूरमधील सुज्ञ जनता आमच्या पाठीशी ठाम उभी आहे. शहराच्या विकासाचा मुद्दा समोर ठेवून आम्ही निवडणुकीला एक दिलाने सामोरे जात आहोत.
मल:निस्सारण प्रकल्पाच्या मंजुरीवरून श्रेयवाद उभारला
32 कोटींच्या विकासकामांचा पाठपुरावा जयकुमार गोरे व आमदार मनोज घोरपडे यांनीच केला. या पत्रकार परिषदेत रहिमतपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते निलेश माने यांनी माजी नगराध्यक्ष आनंद कोरे यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तरे दिली. नगरपालिकेसाठी मंजूर असलेल्या 32 कोटींच्या मल:निस्सारण प्रकल्पाच्या मंजुरीवरून श्रेयवाद उभारला आहे. माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी पत्रकार परिषद घेत हे काम आम्हीच मंजूर केले असल्याचा दावा दाखल केला होता.