
‘मंत्र्यांनी जरांगेंचे पाय चेपून द्यावेत’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात
Manoj Jarange Patil : मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात हे आंदोलन होणार असल्याने मुंबईतील गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
गणेशोत्सवामुळे मुंबईत मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सरकार हे आंदोलन कशा पद्धतीने हाताळतं, हे पाहावं लागेल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्याचवेळी सरकार ओबीसी विरुद्ध हिंदू असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे मंत्री ज्या पद्धतीने जातात, त्यावर वडेट्टीवार यांनी बोचरी टीका केली. मंत्री इतकी मान वाकवून जरांगेंकडे जातात की त्यांची मान कशी तुटत नाही, असा सवाल त्यांनी केला.
जरांगेंसमोर सरकार झुकत असल्यामुळे त्यांना आपण बादशहा झाल्यासारखं वाटतं, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. सरकार झुकत आहे आणि त्यामुळे परिस्थितीचा फायदा घेतला जात असल्याचंही ते म्हणाले.
ओबीसींच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापुढे वारंवार हे सरकार मान झुकवत आले आहे. त्यामुळे जरांगे पाटील स्वतःला बादशाह समजायला लागले आहेत. आता पुन्हा ते मुंबईत आंदोलन करणार आहेत. आम्ही त्यात पडणार नाही; महायुती सरकार कायदा आणि सुव्यवस्था बघून घेईल.#LawAndOrder #GovernmentAccountability… pic.twitter.com/uO00G7KG0S — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 14, 2026
जर सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी जरांगेंचं आंदोलन हाणून पाडावं, असं थेट आव्हान वडेट्टीवार यांनी दिलं. आंदोलन करण्याला आपला विरोध नसल्याचं सांगत सरकारने मात्र कायदा-सुव्यवस्था आणि ओबीसींच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर उपरोधिक शब्दांत आणखी टीका केली. जरांगे मोठमोठ्या नेत्यांवर बोलत असतील तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. सरकारमध्ये कारवाईची हिंमत नसेल तर पुन्हा मंत्र्यांना पाठवावं आणि आंदोलकांचे पाय चेपून द्यावेत, असा टोला त्यांनी लगावला.
जरांगे पाटलांच्या पायाची मसाज करून द्या, म्हणजे ते सरकारचं ऐकतील, असा उपरोधिक टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. सध्या राज्यात जे काही सुरू आहे, ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, ओबीसींच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी, अशी मागणी करत वडेट्टीवार यांनी आगामी काळात हा मुद्दा आणखी आक्रमकपणे मांडण्याचे संकेत दिले आहेत.