
Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलनाला सुरुवात करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. आंदोलनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर 123 गावांतील प्रमुख मराठा बांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
गावागावातील मराठा बांधवांनी आपल्या वाहनांसह अंतरवाली सराटीकडे यावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगताना ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सामान्य पातळीवर कोणताही वाद नसल्याचा दावा त्यांनी केला.
आरक्षणाच्या प्रश्नावर नोंदी उपलब्ध असलेल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका काही ओबीसी बांधवांचीही असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मात्र, राजकीय नेत्यांकडून गरीब आणि लहान ओबीसी समूहांचा वापर मराठा समाजाच्या विरोधात केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
यावेळी त्यांनी ‘मायक्रो ओबीसी’च्या प्रश्नावरूनही राजकीय नेतृत्वाला लक्ष्य केले. शिक्षण, रोजगार आणि राजकारणातील संधींचा लाभ या समाजातील घटकांना कितपत मिळाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गरीब ओबीसींच्या हक्कांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही रणनीती आखली तर मराठा समाजही त्याला प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईतील मराठा समाज मोठ्या संख्येने सज्ज असल्याचा दावा करत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा परिस्थितीनुसार ठरवली जाईल, असे संकेत दिले. त्यामुळे 29 ऑगस्टपासून प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.