महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; 'या' पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात महाराष्ट्राचे कृषिमंत्रिपद म्हणजे काटेरी मुकुट ठरत आहे. आतापर्यंत राज्यात पाच बड्या नेत्यांनी कृषिमंत्रीपद सांभाळले ते सारे नेते या खात्यामुळे गोत्यात आल्याचे दिसून येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलाने यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी धनंजय मुंडे असो एकनाथ खडसे असो वा इतर नेते यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक घडामोडी घडल्या आहेत.
कृषिमंत्रिपद हे ज्या राजकीय नेत्याकडे जाते, त्याच्यावर वेगवेगळे आरोप होतात, असाच अनुभव महाराष्ट्राने आजवर घेतला. राज्याच्या कृषी खात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या दीड दशकात याच कृषीखात्याच्या मंत्र्यांमागे वादाचं ग्रहण लागल्याचे दिसून येते. ज्याच्याकडे कृषी खात्याचा पदभार जातो, तो मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकतो, हा इतिहास आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषिखात्याचा पदभार होता. आधी सततची वादग्रस्त वक्तव्यं आणि नुकताच रमी खेळतानाचा कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कोकाटेंना कृषिमंत्रीपद गमवावं लागले.
हेदेखील वाचा : महायुतीचे नेते काही सुधारेना! आपल्या बापाचा पैसा आहे का? रोहित पवारांच्या रडावर आता शिंदेंचा नवा नेता, व्हिडिओ व्हायरल
एखाद्या वादामुळे कृषीखाते सोडावे लागणारे माणिकराव कोकाटे एकटे नाहीत. तर यापूर्वी अनेक नेत्यांना कृषिमंत्रिपदावर असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. 2014 मध्ये एकनाथ खडसे कृषिमंत्री झाले. खडसेंवर वेगवेगळे आरोप झाल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर एकनाथ खडसेंचे राजकीय करिअरच उतरणीला लागले.
2022 मध्ये अब्दुल सत्तार कृषीमंत्री
2019 मध्ये दादा भुसे कृषिमंत्री झाले. पण नंतर 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये त्यांना दुय्यम खाते मिळाले. 2022 मध्ये अब्दुल सत्तार कृषिमंत्री झाले. अब्दुल सत्तारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अब्दुल सत्तारांकडील कृषीखाते काढून घेतले. 2025 च्या सरकारमध्ये सत्तारांना डच्चू मिळाला. धनंजय मुंडे हे 2023 मध्ये कृषीमंत्री झाले होते. मात्र, नंतर तेही अडचणीत आले होते.
अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेते अडचणीत
महायुतीमधील अनेक नेते वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनंजय मुंडे हे बीडमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे अडचणीत आले. तर माणिकराव कोकाटे हे थेट शासनाला भिकारी म्हणाले होते. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला तर माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले.