
आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे 'अॅक्शन मोड'वर; लागू करणार 'हा' फॉर्म्युला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळींकडून भाजपसह इतर सत्ताधारी पक्षात प्रवेश केला जात आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांकडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला जात असल्याने आता एकनाथ शिंदे ‘अॅक्शन मोड’वर आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शुक्रवार आणि शनिवारी उपमुख्यमंत्री शिंदे फक्त आमदारांच्या व्यथा ऐकणार आहेत.
शिवसेना शिंदे गटातील संभाव्य गळती रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी खेळी आखली आहे. एकनाथ शिंदे हे शुक्रवार आणि शनिवारी शिंदे फक्त आमदारांच्या व्यथा ऐकणार आहेत. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडूनच पदाधिकारी व उमेदवार फोडले जात असल्याने शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर परस्पर सहमतीने एकमेकांच्या पक्षातील नेते-कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय झाला. तरीही तळागाळातील नाराजी कायम आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षातील आमदार फुटू नयेत, कार्यकर्त्यांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी शिंदे स्वतः पुढाकार घेत आहेत.
हेदेखील वाचा : Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी
दरम्यान, महापालिकेच्या निर्णायक पश्चिम उपनगरावर लक्ष केंद्रित करत तीन आमदारांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रकाश सुर्वे (मागाठाणे), मुरजीकाका पटेल (अंधेरी) आणि दिलीप मामा लांडे (कुर्ला) या तिघांकडे १२ ते १५ जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पालिका रणनितीला वेग, 125 जागांचा प्रस्ताव?
सूत्रांनुसार, एकनाथ शिंदेंनी पालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई महापालिकेत १२५ जागांसाठी शिंदे आग्रही असून, लवकरच हा प्रस्ताव भाजपासमोर अधिकृतपणे मांडला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा शिंदेंचा प्रयत्न असणार आहे.
आमदारांनी शिंदेंकडे वाचला तक्रारींचा पाढा
राज्यामध्ये एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे, राजकीय पक्षामध्ये नाराजीनाट्य पसरले आहे. महायुतीमध्ये काही दिवसांपूर्वी तिन्ही पक्षामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे समोर आले होते. प्रचार करताना महायुतीच्याच तिन्ही पक्षांनी एकमेकांचे वाभाडे काढल्याचे दिसून आले. यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षामध्ये वाद सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक आमदार हे नाराज असून त्यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्या अडचणी सांगितल्या आहेत.