
मनोज जरांगेंपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
Maratha Reservation : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटील काय करत आहेत किंवा त्यांची भूमिका काय आहे, यापेक्षा राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील हे जालन्यावरून मुंबईला मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आंदोलनासाठी येणार आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्रातील तब्बल 18 जिल्ह्यांमध्ये पाऊस काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकं करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून आज पुन्हा दुपारी चार वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.”
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचं तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल, याचा आढावा घेतला जात आहे. परिस्थितीचा संपूर्ण अहवाल तयार झाल्यानंतर तो आगामी कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार आहे.”
दरम्यान, मुंबईतील आंदोलनाच्या मुद्द्यावरही बावनकुळेंनी आंदोलकांना आवाहन केलं. “मुंबईत आंदोलन झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणं योग्य ठरणार नाही,” असं त्यांनी म्हटलं. ओबीसी असो किंवा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलता येणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
“देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत यापूर्वी अनेक निर्णय घेतले आहेत. सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करत असून त्यासाठी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे,” असं बावनकुळे म्हणाले.
“शेतकरी आत्महत्या रोखणं आणि संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही सध्या सरकारसमोरील मोठी जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांना राज्यातील परिस्थितीचा आढावा दिला जाणार असून पालकमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणाही प्रत्यक्ष दौरे करणार aआहेत,” अशी माहिती बावनकुळेंनी दिली.