
Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News
Maratha Reservation Mumbai Movement: राज्य सरकारने चर्चेचे सर्व दरवाजे बंद केल्यानेच मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुंबईत येण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. जरांगे यांना मुंबईत येण्यासाठी सरकारच जाणीवपूर्वक चिथावत असून मुंबईकरांना होणाऱ्या संभाव्य त्रासाला सरकारच जबाबदार असेल,” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आरक्षणासाठी आज पुन्हा मराठा आंदोलतांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. यावरुन राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच या घडामोडींवर संजय राऊत यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ जरांगे पाटील हे अतिशय समजुतदार नेते आहेत. मुंबईकरांना किंवा गणेशोत्सवात त्रास व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही. पण मुंबईच्या ज्या भागात जरांगे पाटील यांचे प्रस्तावित आंदोलन आहे. त्याच ठिकाणी लालबागचा राजा, चिंतामणी आणि इतर प्रसिद्ध गणपती देखील विराजमान होतात. गणेशोत्सवाच्या काळात जगभरातून लाखो- करोडो पर्यटक मुंबईत दाखल होत असतात. या गणेशोत्सवाला काही त्रास व्हावा अशी जरांगेंची इच्छा नाही. माझी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा होत असते. पण सरकार ची मात्र तशी इच्छा दिसत नाही. आम्ही तुमचं म्हणणं ऐकणारच नाही,पण सरकार त्यांना मुंबईत येण्यासाठी जबरदस्तीने मजबूर करत असल्याचे दिसत आहे.
विरोधक किंवा आंदोलकांसाठी चर्चेचे दरवाजे बंद करणे हे चांगल्या राज्यकर्त्यांचे लक्षण नाही. गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही बंद दरवाजांची परंपरा सुरू केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी तातडीने चर्चा करून मार्ग काढणे ही सरकारची जबाबदारी असतानाही सत्ताधारी मात्र अहंकाराच्या शिखरावर बसले आहेत. शिव्या देऊन प्रश्न सुटत नाहीत, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणतात. त्यांची भूमिका योग्य असली तरी, आधी महाजनांना जरांगेंशी अधिकृत चर्चा करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी दिला आहे का, याचा खुलासा त्यांनी करावा.”
काल मी मराठवाड्यात होतो. दोन दिवस संपूर्ण मराठवाडा खदखताना दिसला. मराठवाड्यामध्ये कोरडा दुष्काळ आहे आणि हा दुष्काळ अत्यंत चिंताजनक आहे सोयाबीन असेल किंवा अन्य काही जी पीके शेतकरी तिकडे घेत आहेत, ती अक्षरश: जळून गेली आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळापासून इथे पावसाचा एक थेंब पडलेला नाही. ही खदखद हीच आग दुसऱ्या आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्येही दिसत आहे. मनोज जरांगे पाटील हे यासाठीही उपोषणाला बसले आहेत. पण या दोन्ही प्रश्नांवर महाराष्ट्राचे सरकार कोणतेही पावलं उचलायला तयार नाही.