
‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल,' अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला 14 दिवस झाले असतानाही सरकारने त्यांची विचारपूस केली नसल्याचा आरोप दीपके यांनी केला. जनतेने निवडून दिलेले लोक सर्वांना भेटतात, मात्र जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार नसल्याची टीका त्यांनी केली. मनोज जरांगे यांच्यासारख्या समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीला सरकार अशा अवस्थेत सोडून देणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दीपके यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासोबतच शिक्षण आणि रोजगाराचा मुद्दाही उपस्थित केला. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण झाल्या असत्या, तर जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ आली असती का, असा सवाल त्यांनी केला. सरकारने ग्रामीण भागातील शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करत, जरांगे आरक्षणाची मागणी का करत आहेत हे सरकारने समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
दीपके यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत सरकारला इशारा दिला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचा उल्लेख करत, मनोज जरांगे यांच्या बाबतीत अशा प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी म्हटले. “हा महाराष्ट्र आहे, इथे हे अजिबात चालणार नाही. मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथे येईल,” असा इशारा दीपके यांनी दिला.
सरकारने स्वतः अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांच्या मागण्या ऐकाव्यात, अशी मागणी दीपके यांनी केली. जनतेने लोकप्रतिनिधींना आपली कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, केवळ हेलिकॉप्टरमधून फिरण्यासाठी नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मनोज जरांगे समाजासाठी लढत असून आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी चर्चा करून प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी दीपके यांनी केली.
जरांगे यांच्या उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे. त्यात विविध संघटना आणि नेत्यांकडून जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याने सरकार पुढील काळात कोणती भूमिका घेते आणि जरांगे यांच्याशी चर्चेसाठी पुढाकार घेते का, याकडे लक्ष लागले आहे.