
MLA Rohit Pawar doubt on of Mumbai Churchgate BJP office land foundation by Amit Shah
Rohit Pawar on BJP Office: मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप जेष्ठ नेते अमित शाह हे आज (दि.27) मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या हस्ते मुंबईमधील भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. चर्चगेट परिसरामध्ये असणाऱ्या या भाजपच्या कार्यालयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संशय उपस्थित केला आहे. भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात सध्या जमीन घोटाळ्यांच्या चर्चा जोरात असताना, मुंबईतील भाजपाच्या नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनाने राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईतील या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या जागेच्या मालकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, भाजपा नेत्यांना खुलासा करण्याची मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे, “राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग अँड फायनान्स कॉर्पोरेशनची ९९ वर्षांच्या लीजवर घेतलेली आहे. इमारत धोकादायक असल्याचे कारण देत ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्याच ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झाले आहे.” असा संशय आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी लिहिले आहे की, Lease Land, Shedule W जागा विकण्याचा पायंडा पाडला जाणार असेल तर उद्या महालक्ष्मी रेसकोर्स सारख्या अनेक महत्वपूर्ण जागा देखील खाजगी लोकांच्या घशात घातल्या जातील का? पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण दाबण्यासाठी ज्याप्रकारे सर्व मिडीया हाऊसेसला फोन करण्यात आले तसेच फोन आज मुंबईतील या जागेसाठी करण्यात आल्याचे देखील समजत आहे. त्यामुळे हे प्रकरण देखील गंभीर असून आयुक्तांनी खुलासा करण्याची गरज आहे. आयुक्तांनी खुलासा न केल्यास उद्या आम्ही आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची फाईल दाखवण्याची मागणी करू, असा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाची जागा Lease Land असल्याचे, Shedule W ची जागा असल्याची तसेच lease renovation झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. Lease Land, Shedule W असलेली जागा lease renovation झाले नसल्यास विकता येते का? याचा खुलासा @mybmc आयुक्त करतील का?… — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 27, 2025
रोहित पवार यांनी पुढे असा मुद्दा मांडला की, “पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणासारख्या घटनांमुळे जनतेचा रोष असताना अशा संशयास्पद जागेवर भूमिपूजन करणे चुकीचा संदेश देईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांसारख्या भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करावा,” अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपाकडून अद्याप या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. पक्षाचे नेते आशीष शेलार यांनी भूमिपूजनानंतर बोलताना म्हटले, “हे नवीन कार्यालय मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसाठी एक मजबूत केंद्र ठरेल. जागा पूर्णपणे कायदेशीर मार्गाने प्राप्त झाली असून, कोणत्याही घोटाळ्याचा प्रश्न येत नाही.” मात्र, रोहित पवार यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर या विषयावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.