
vidhan bhavan
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर पाचही मतदारसंघांतील लढतीचं प्राथमिक चित्र समोर आलं आहे. पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि संभाजीनगर पदवीधर या पाच मतदारसंघांत प्रमुख पक्षांसोबतच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात प्रमुख लढत अपेक्षित आहे. मात्र शिवसेनेचे मंगेश चिवटे आणि अपक्ष सचिन सानप यांनीही अर्ज दाखल केल्याने समीकरणं गुंतागुंतीची झाली आहेत. अतिरिक्त उमेदवारांमुळे मतविभाजनाचा फटका कोणाला बसतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव मैदानात आहेत. मात्र राष्ट्रवादीचे भैय्या माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार दत्ता सावंत यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख सामना आहे. मात्र भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीचे नितेश कराळे आणि संजय थुल यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या अदिती पोहरे, ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने आणि शिवसेनेचे किरण सरनाईक यांच्यात प्रमुख लढत दिसत आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू आणि शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही अर्ज दाखल केला आहे.
याशिवाय युवा स्वाभिमान संघटनेच्या प्रीती रेवणे यांच्यासह भाजपशी संबंधित अनेक दावेदारांनीही अर्ज दाखल केले आहेत. शेखर भोयर, सुमित पवार, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहिणी संगीता शिंदे यांच्याही उमेदवारीमुळे अमरावतीची लढत लक्षवेधी बनली आहे.
संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांच्यात प्रमुख सामना अपेक्षित आहे. भाजपचे नेते एम. के. देशमुख यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपचीही लढतीत एंट्री झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनीही अर्ज दाखल केला आहे.
आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. सध्याच्या घडीला पुणे, नागपूर आणि अमरावतीमध्ये बंडखोरीचा मुद्दा ठळक दिसत असून, पाचही मतदारसंघांत अतिरिक्त उमेदवारांमुळे मतविभाजनाचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अंतिम लढत कोणाकोणात होते आणि बंडखोरीचा फायदा नेमका कुणाला मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा