mns raj thackeray meet cm devendra fadnavis on varsha before mumbai BMC Elections 2025
मुंबई : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेसह इतर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये भेटीचे सत्र वाढले आहे. निवडणूक जाहीर होताच अनेक हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंसोबत युतीची चर्चा सुरु असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मागील अनेक दिवसांपासून मनसे नेते राज ठाकरे हे चर्चेमध्ये आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु होत्या. ठाकरे बंधू हे एकत्र येणार असल्यामुळे अनेक मराठी माणसांनी समाधान व्यक्त केले होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याबाबत सूचक सोशल मीडिया पोस्ट देखील केली होती. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकीमध्ये राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर राज ठाकरे यांनी भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली आहे. मात्र या भेटीचे कारण अद्याप समोक आलेले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांपूर्वी झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे राज ठाकरे हे नक्की कोणत्या युतीमध्ये सामील होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
काल मतभेद आज गळाभेट
भारताकडून पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी दहशतवादाला उत्तर हे युद्ध असू शकत नाही, पर्यटनस्थळी सुरक्षा का नव्हती? ही सुरक्षा वाढवली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत देश या कारवाईच्या पाठिशी उभा आहे. या कारवाईचे स्वागत करतो आहे. संपूर्ण जग भारताची वाहवा करत आहे आणि भारताच्या पाठिशी जग उभे आहे.” असे सांगितले. त्यामुळे काल ऑपरेशन सिंदूरवरुन दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद दिसून आलेले असताना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण भेट मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसला. राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये एकाही जागेवर उमेदवार निवडणून आणता आलेला नाही. त्यामुळे आता राज ठाकरे आणि मनसे पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत.