mp sanjay raut and sushma andhare on eknath shinde jay gujarat ghoshana
मुंबई : राज्यामध्ये सध्या हिंदी आणि मराठी भाषा असा वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे. पुण्यातील गुजरात भवनच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्रानंतरच्या जय गुजरातची घोषणा दिली. यावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जय गुजरातच्या घोषणेवरुन खरपूस समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन संजय राऊत यांनी टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले! पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. हजार माराव्या आणि एक मोजाव्या.. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच ठाकरे गटाच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन देखील एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. पदासाठी एवढी लाचारी महाराष्ट्राने कधीच बघतली नव्हती! असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. तर शहा सेना! शहा सेना! असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचे कोणतेही आश्चर्य वाटत नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!
पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली!
काय करायचे?
ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा
हजार माराव्या आणि एक मोजाव्या
हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?
@Dev_Fadnavis pic.twitter.com/gHhMo8cpA2— Sanjay Raut (@rautsanjay61) July 4, 2025
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राची अस्मिता गुजरात आणि दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची बक्षिसी कदाचित त्यांना मिळाली आहे. ही बक्षिसी मिळाल्यानंतर सर्वात अतिउत्तम लाचार मी कला अतिउत्तम धाट मी कसा ही दाखवण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. ज्या पद्धतीने अजित पवार यांनी सर्व ताब्यात घेतलं आहे. एका अर्थाने एकनाथ शिंदे हे आऊटसाईडर झाले आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा स्ट्रीममध्ये येण्यासाठी त्यांना हे बोलणे गरजेचे आहे,” असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या की, “या वक्तव्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या अर्थाने मुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती जय गुजरात म्हणते तिथे सुशील केडिया सारख्या व्यक्तींनी मी मराठी बोलणार नाही काय करायचं ते करा हा उन्मतपणा त्यांच्या ठायी येणे फार स्वाभाविक होते. हे वक्तव्य राजकीय डावपेचाचे कारण आहे. गैरमराठी मतांचे एकत्रिकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपच्या या प्रयत्नामध्ये मी कसा तुमचा सर्वात मोठा भाग आहे दाखवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे,” असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.