हिंदी भाषा लादण्यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. राज्य सरकारकडून आधी पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांना हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली तर नंतर हिंदी भाषा पर्यायी भाषा म्हणून देण्यात आली. यावरुन आता विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. मनसे, ठाकरे गटानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. सपकाळ यांनी राज्यामध्ये सुरु असलेल्या हिंदी मराठी वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सपकाळ म्हणाले की, “मराठी ही केवळ एक भाषा नाही तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेची, संस्कृतीची, इतिहासाची आणि लोकजीवन आणि अभिव्यक्तीचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकशाहीच्या चळवळींपासून सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनांपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेनेच या भूमीच्या विचारांना आकार दिला आहे,” अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मात्र, दुर्दैवाने आज महाराष्ट्रात मराठी भाषेवरच अन्याय सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशावर चालणाऱ्या राज्य सरकारने सुरू केला आहे. मातृभाषेचा अवमान आणि मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर होणारी भाषिक सक्ती ही केवळ अपमानास्पद नाही, तर ही सांस्कृतिक गुलामगिरीकडे घेऊन जाणारी हिंदी – हिंदू- हिंदू राष्ट्र या उद्देशाने सुरु आहे,” असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
“हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटनांसह काँग्रेसने या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. मराठीचा अभिमान, तिचं संवर्धन आणि तिच्या प्रतिष्ठेचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष हा केवळ आंदोलनापुरता मर्यादित नाही, तर तो दीर्घकालीन, वैचारिक आणि लोकशाही मूल्यांचा लढा आहे. राज्य सरकारने दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असले, तरी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली नवीन समिती ही सरकारच्या पुन्हा एकदा हिंदी लादण्याच्या संभाव्य कटाचा स्पष्ट संकेत आहे,” असा आरोप देखील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“या भूमीचा प्रत्येक कण, प्रेरणा देणारा आहे, प्रत्येक चळवळ ही मराठी भाषेतूनच घडलेली आहे. त्यामुळे मराठीवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाविरोधात काँग्रेसचा लढा अखंड आणि अविरत राहील. भविष्यातही मराठी भाषेच्या सन्मानासाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील. मराठी माणूस, मराठी संस्कृती, आणि महाराष्ट्राच्या आत्म्याचे रक्षण हेच आमचे आद्य कर्तव्य राहील,” असा आक्रमक पवित्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला आहे.