MP Sanjay Raut claims that there are 2 thousand missing people in the Maha Kumbh Mela
मुंबई : राज्यामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महायुती सरकारने याचा शासन निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (दि.14) राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. लव्ह जिहादच्या नावाने वातावरण खराब करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते त्यांनी लव्ह जिहादच्या निर्णयावर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की,”हे सरकार कामाच्या नावावर मत मागू शकत नाही फसवणूक करून, निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय मिळवतात. त्यामुळे हे अशा घोषणा करत राहणार. लव्ह जिहाद च्य नावाने वातावरण खराब करीत आहेत. भाजपाकडील काही भाषण माफिया हे ठरवणार का? लव्ह जिहाद झाला म्हणून,” असा घणाघात खासदार राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी भाजपच्या सत्ताधारी नेत्यांना निधी मिळणार असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “सरपंच आमच्या पक्षाचा नाही त्यांना विकास निधी देणारा नाही असे विधान एक मंत्री करतो पैसा यांच्या बापाचा आहे का? पैसा जनतेचा आहे हे असे करत आहेत. मंत्री पदाची शपथ घेताना कोणासोबत द्वेषभावना ठेवणार नाही असे बोलतात. पण त्या विरोधात काम करतात हा संविधानाचा अपमान करत आहेत,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
याचबरोबर आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे. आरोप प्रत्यारोपानंतर चार तास बंद दाराआड चर्चा केल्यामुळे टीकेची झोड उठवली आहे. यावर खासदार राऊत म्हणाले की, “आमदार सुरेश धस हे कधी ही पलटी मारतील ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आहे. धस यांनी ही कृती केली असेल तर देव त्यांना क्षमा करणारा नाही. ते पाप आहे. विश्वासघात या पेक्षा पुढले पाऊल आहे. बीड मधील काही नेत्यांनी मला धस यांच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. मला अजून अपेक्षा आहे धस असे काही करणारा नाही,” अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवारासह प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होत अमृतस्नान केले. यावरुन टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “कुंभमेळ्यात सर्वांनी जायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस गेले त्यात चुकीचे काही नाही. पण किती लोक मेले हे सांगण्यासाठी ते अजून ही तयार नाहीत. महाकुंभमेळ्यामध्ये 2 हजार हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. आमचा आरोप आहे ते मेले आहेत. सरकार हे लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेत मी प्रश्न विचारला तर माझा माईक बंद केला गेला. एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहा यांच्या मालकीचा आहे. ते सांगतील ते एकनाथ शिंदे बोलणार. त्यांना सध्या पक्ष चालवायला दिला आहे,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.