
MP Sanjay Raut Demands Chandrashekar Bawankule arrest on BJP Phone on Surveillance
Bawankule Mobile Surveillance: मुंबई : राज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे भाजपसह सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे, महापालिका आणि नगर परिषदांवर वर्चस्व कायम राखण्यासाठी ग्राऊंड लेव्हलवर तयारी केली जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर पालिका मिळवण्यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भंडाऱ्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये बावनकुळे यांनी धक्कादायक विधान केले. यामुळे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर इंडियन टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करा आणि त्यांची चौकशी करा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगेसिसचं मशीन स्वतः आणलेले आहे का? की भाजपाच्या कार्यालयात लावलेले आहे? किंवा त्यासाठी काही खासगी लोक कामाला लावले आहेत का?” असे अनेक गंभीर प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “हा विषय फक्त भाजपाच्या संदर्भात नसून महाराष्ट्रातील सर्व विरोधी प्रमुख नेत्यांचे देखील फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत. त्यांचे व्हॉट्सअॅप पाहिले जात आहेत. हे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि मुंबईतील काही बिल्डर्स आणि नागपूरमधील काही पंत्रणा यांनी एकत्र येऊन एक वॉर रूम सुरु केले आहे. त्या माध्यमातून शिंदे गटाच्या नेत्यांचेही फोन सर्व्हिलन्सवर आहेत,” असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बावनकुळे म्हणाले की, “तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे चुकीचं बटण दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप सर्वलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलत्तंय त्यावर लक्ष आहे, तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचे नुकसान होईल. तुमचे एक चुकीचं पाऊल भंडारा शहर उद्ध्वस्त करेल निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाहीं तर रागाच्या भरात काही लोक तमाशा उभा करतात, चुकीचं मत व्यक्त करतात. तुमचं एक चुकीचं मत व तुमच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसेल.”असे वक्तव्य भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.