भंडाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्याचा फोन टेहळणीवर असल्याचे धक्कादायक विधान केले (फोटो - सोशल मीडिया)
BJP Worker Phone on Surveillance: भंडारा : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरु झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. भंडाऱ्यामध्ये भाजप पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यामध्ये भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्जड दम भरला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा वापर जपून करण्याचे सांगितले. मात्र हे सांगताना कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉटसअप सर्वेलन्सवर टाकले असल्याचे धक्कादायक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “कार्यकर्त्यांनो, सोशल मीडियाचा वापर जपून करा. तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचे नुकसान होईल. तुमचे एक चुकीचं पाऊल भंडारा शहर उद्ध्वस्त करेल निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाहीं तर रागाच्या भरात काही लोक तमाशा उभा करतात, चुकीचं मत व्यक्त करतात. तुमचं एक चुकीचं मत व तुमच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसेल.” असे स्पष्ट मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे चुकीचं बटण दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप सर्वलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलत्तंय त्यावर लक्ष आहे, असे धक्कादायक विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या एका चुकीच्या सोशल मीडिया पोस्टची किंवा फॉर्वड केलेल्या मेसेजची खूप मोठी शिक्षा भाजप कार्यकर्त्यांना भोगावी लागू शकते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असते. यामध्ये युतीमध्ये लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला तर अनेकांचा हिरमोड होऊन बंडखोरीची शक्यता मोठी असते. याचा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी उल्लेख करत इशारा दिला आहे. ते म्हणाले की, तुमचं एक चुकीचं बटन पाच वर्षांचं नुकसान करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील”,असा इशारा देखील भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.






