MP Sanjay raut target mahayuti government over marath reservation GR mumbai news
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली. जरांगे पाटील हे हजारो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले होते. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण केले. जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या जीआरनंतर मुंबई सोडली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये ते रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. दरम्याऩ, या सर्व मराठा आरक्षणाच्या विषयांवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर जरांगे पाटील यांनी विजयी गुलाल उधळत मुंबई सोडली. यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले की, “मुंबईत मनोज जरांगेच्या नेतृत्वात मराठी बांधवांनी आंदोलन केलं. आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या मागण्या होत्या. पावसात आणि चिखलात ते आंदोलन करत होते. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. जर आंदोलक आणि मनोज जरांगे समाधानी असतील तर आम्ही समाधानी आहोत,” अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठी माणसाची एकजूट असलीच पाहिजे
पुढे राऊत म्हणाले की, “मराठा समाजाच्या वेदना, क्लेश सरकारने संपवलं असेल तर आम्हीही सरकारचं अभिनंदन करु. छगन भुजबळ म्हणाले ते योग्य आहे की पूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोपर्यंत कुणीही आकांडतांडव करु नये. ओबीसी असो की मराठा सगळे महाराष्ट्रातलेच बांधव आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट आहे. जातीपातीच्या मुद्द्यावर कुणीही भेदाभेद करु नये. मराठी माणसाची एकजूट असलीच पाहिजे असं बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं. आम्ही त्याच विचारांवर चालणारे आहोत,” असेही राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यामुळे मी फडणवीस यांचं कौतुक करतो
“भाजपाचे काही नेते अजूनही मनोज जरांगेची कुचेष्टाच करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कसं जरांगेना बाहेर काढलं. शेवट गोड झालेला आहे आणि स्वत आंदोलकांनी गुलाल उधळलेला आहे. तसा नवी मुंबईतही गुलाल उधळला होता. पण नवी मुंबईतील गुलाल आणि मुंबईत उधळलेला गुलाल यात काय तफावत आहे, याकडे अभ्यासक म्हणून मला पहायचं आहे. कारण भाजपा हा दुतोंड्या गांडुळासारखा पक्ष आहे. मनोज जरागे मुंबईत आले तेव्हा टोकाचा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाच्या लोकांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या स्थितीत संयम दाखवला. त्यामुळे मी फडणवीस यांचं कौतुक करतो. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते?” असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.