फोटो सौजन्य - Social Media
कन्नड चित्रपटसृष्टीत अतिशय नाव कमावलेली अभिनेत्री रान्या राव सध्या अटकेत असून सोन्याच्या तस्करी प्रकरणात ती सापडली होती. ४ मार्च रोजी बंगळुरू विमानतळावर तिला अटक करण्यात आले होते. १५ दिवसांत तिने एकदा नव्हे तर तब्बल ४ वेळा दुबई ट्रिप केली होती. त्यामुळे ती DRI च्या नजरेत कैद होती. दुबईहून परतत असताना बंगळुरूमध्ये तिची झडती घेण्यात आली तेव्हा तिच्याकडे तब्बल १४.८ किलो सोने सापडले.
या सोन्याचा बाजारभाव सध्या १२ कोटी इतका आहे. दरम्यान, या प्रकरणात नवे वळण आले आहे. अभिनेत्रीला न्यायालयाने दंड सुनावले आहे. अभिनेत्रीला आता १०२ कोटींचा दंड भरावे लागणार असून या प्रकरणात आणखीन काही जणांचा समावेश असणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आणखीन तीन जणं सापडली असून अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की,” दंडाची गणना ही पूर्णपणे सापडलेल्या सोन्याचे बाजारमूल्य + समोर आलेले तपशील + सीमाशुल्क यांच्या माध्यमातून केली गेली आहे. तसेच जरी अभिनेत्रीला दंड भरावे लागत असले तरी हा खटला कायदेशीर रित्या तशाच सुरु राहणार आहे.”
दरम्यान, अभिनेत्रीच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता. या मोहिमेदरम्यान, पोलिसांच्या हाती २.६७ कोटींची रक्कम लागली असून घरामध्ये २.०६ कोटींचे सोनेही सापडले आहे, जे सध्या जप्त करण्यात आले आहे. विमानतळावर अभिनेत्रीच्या जॅकेटमध्ये १२.५६ कोटींचे १४ किलो सोने जप्त करण्यात आले होते. सध्या अभिनेत्री तुरुंगात असून सुनावण्यात आलेल्या दंडामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
‘या’ दाक्षिणात्य भाषांमध्ये अभिनेत्री आली होती झळकून
रान्या राव दाक्षिणात्य सृष्टीतील अभिनेत्री असून ती २०१४ मध्ये माणिक्य या चित्रपटात दिसून आली होती. तर तिने वागह, पटकी या सिनेमातही काम केले आहे. अभिनेत्री पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे DGP रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी असल्यामुळे हे प्रकरण आणखीन चर्चेत येत आहे.